खडकवासला : युवकांना ग्रामीण विकासाचे धडे | पुढारी

खडकवासला : युवकांना ग्रामीण विकासाचे धडे

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : मालखेड येथे मराठवाडा मित्र मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरात महाविद्यालयीन युवकांनी ग्रामीण विकासाचे धडे घेतले. युवकांसह युवती स्वयंसेवक, शिक्षक, स्थानिक कार्यकर्ते या शिबिरात सहभागी झाले होते.

सरपंच नंदा जोरी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार, शिबिर अधिकारी प्रा.प्रवीण कड,प्रा.सुशील गंगणे, डॉ.संदीप अनपट व शिक्षकांनी संयोजन केले. गाव व परिसरातील वाड्यावस्त्यांत श्रमदान, ग्राम सर्वेक्षण, शाळा व मंदिर, रस्त्यांची स्वच्छता, पथनाट्यातून समाजप्रबोधन, जलसंवर्धन, पर्यावरण जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्ती, लिंगभाव संवेदनशीलता जाणीवजागृती, सामाजिक प्रबोधन, बौद्धिक चर्चासत्रे, व्याख्याने, शरयू हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिर आदी उपक्रम राबविण्यात आले.

विविध विषयांवर प्रा.सारंग एडके, प्रा. विशाल पवार, डॉ. अमित गोगावले ,डॉ. विशाल गायकवाड, संतोष पटवर्धन, डॉ. अजय दुधाने, प्रा. अमोल चौधरी व नवनाथ लोंढे यांनी मार्गदर्शन केले. समारोपप्रसंगी इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांनी सिंहगड परिसरातील ऐतिहासिक स्थळांची माहिती दिली.

Back to top button