पुणे : ‘ऑन कॉल डॉक्टर’वर प्रशासकीय कारवाई | पुढारी

पुणे : ‘ऑन कॉल डॉक्टर’वर प्रशासकीय कारवाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बाळ दगावल्या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली. प्रकरणाचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांकडे सादर केला आहे. रुग्णास वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणे आवश्यक होते. ऑन कॉल असलेल्या डॉ. बिडकर यांनी रुग्णास तपासले नसल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याची शिफारस समितीने केली आहे. औंध जिल्हा रुग्णालयात गर्भवतीला वेळेवर उपचार मिळाले नाहीत.

ससूनला नेत असताना रुग्णवाहिकेतच प्रसूती होऊन बाळाचा मृत्यू झाला. औंध रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यावर संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली होती. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून समितीने अहवाल दिला आहे.

डॉ. आशिष कोकरे, डॉ. कविता कोरे, डॉ. वर्षा डोईफोडे यांनी अहवाल सादर केला आहे. दीप्ती शाम विरणक (वय 22) या गर्भवतीचे बाळ कमी दिवसांचे असल्याने प्रसूतीपश्चात बाळाची श्वसनक्रिया चालू होण्यास अडचण येण्याची शक्यता होती. बाळास जन्मानंतर व्हेंटिलेटरची गरज भासू शकली असती, असे निरीक्षण समितीने नोंदवले आहे.

गर्भवती महिला रुग्णालयात आली असताना गर्भाशयाचे तोंड 3 सेंटीमीटर उघडलेले होते. बाळाच्या ह्रदयाचे ठोके कमी प्रमाणात लागत होते. ही परिस्थिती ऑन कॉल डॉ. बिडकर यांना दूरध्वनीद्वारे कळवण्यात आली. डॉ. बिडकर यांनी प्रसूतीपश्चात बाळाला व्हेंटिलेटरची आवश्यकता भासू शकते, हे लक्षात घेऊन ससून रुग्णालयात संदर्भित करण्याबाबत आदेश दिले. ड्यूटीवर असलेल्या अधिपरिचारिका यांनी 108 रुग्णवाहिकेस बोलावून घेते, असे सांगितले असताना रुग्णाच्या नातेवाईकांनी स्वत:च्या वाहनातून नेण्याची तयारी दर्शवली, असे अहवालात नमूद केले आहे.

Back to top button