पुणे : स्थूलतेची समस्या कळतेय; पण वळत नाही! | पुढारी

पुणे : स्थूलतेची समस्या कळतेय; पण वळत नाही!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्थूलतेमुळे मधुमेह, रक्तदाब, प्रजननक्षमतेत अडथळा, अशा अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. शारीरिक तक्रारींबरोबरच आत्मविश्वास कमी होणे, चिडचिड होणे, न्यूनगंड निर्माण होणे, अशा मानसिक तणावालाही सामोरे जावे लागते. त्यामुळे निराश होण्याऐवजी फिटनेस मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी अधोरेखित केले आहे. यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदतही घेता येऊ शकते.

सातत्याने वाढते वजन अनेक समस्यांना आमंत्रण देते. स्थूलतेमुळे कमी वयातच उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, हाडे ठिसूळ होणे, संधिवात असे आजार बळावतात. वजन आटोक्यात आणले पाहिजे, खाण्यावर नियंत्रण मिळविले पाहिजे, नियमित व्यायाम केला पाहिजे, या सर्व गोष्टींचे महत्त्व माहीत असते. मात्र, या गोष्टींचा अवलंब करताना मनावर नियंत्रण नसणे, आळशीपणा, असे अनेक अडथळे निर्माण होतात. बरेचदा हे अडथळे मानसिक स्वरूपाचे असू शकतात. ’बिंज वॉचिंग’प्रमाणे ’बिंज इटिंग’ची समस्याही सतावत असते. अशा वेळी मानसिक नियंंत्रण मिळविणे समुपदेशनाने शक्य होऊ शकते, असे मानसोपचारतज्ज्ञ गीता कुलकर्णी यांनी सांगितले.

दिवसाच्या ठरावीक वेळी प्रचंड भूक लागते, जिभेचे चोचले पुरविणारे पदार्थ खाल्ल्याशिवाय स्वस्थ वाटत नाही, जंकफूड न खाल्ल्यास रडू येणे, चिडचिड होणे अशा अनेक समस्या स्थूल व्यक्तींना उद्भवत असतात. पोट भरले असले तरी मन भरलेले नसते, अशी काहीशी अवस्था झालेली असते. या समस्येचा संपूर्ण संबंध शारीरिक नसून मानसिक अवस्थेशीही असतो. मानसिक ताण, एखाद्या दुर्घटनेचा सामना केलेला असणे, अशी त्यामागची अनेक कारणे असतात. मानसिक ताणाचा सामना आवडीचे पदार्थ खाऊन केला जातो. अशा परिस्थितीत समुपदेशन, संवाद, मनावर नियंत्रण मिळविण्याच्या द़ृष्टीने काही थेरपी आवश्यक असतात, याकडे डॉ. अनिकेत साळुंखे यांनी लक्ष वेधले.

काय आहेत मानसिक
तणावाची लक्षणे…
चिडचिड होणे
निराश वाटणे
रडू येणे
आत्मविश्वास कमी होणे
न्यूनगंड निर्माण होणे
यक्तिमत्त्व विकासावर परिणाम होणे
एकलकोंडेपणा येणे

काय करावेत उपाय..?
तज्ज्ञांच्या मदतीने आहार,
व्यायाम यांचे वेळापत्रक ठरवून घ्यावे.
गरज भासल्यास मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेण्यात कमीपणा वाटून घेण्याची गरज नाही.
वाढते वजन कमी केल्याने आपल्या व्यक्तिमत्त्व विकासातही सुधारणा होऊ शकते.
वजन कमी करण्यासाठी शॉर्टकट पर्याय अपायकारक असतात, हे समजून घेणे.

Back to top button