पुणे : भाजपच्या माजी नगरसेवकांची अकार्यक्षमता भोवली? | पुढारी

पुणे : भाजपच्या माजी नगरसेवकांची अकार्यक्षमता भोवली?

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत एकहाती सत्तेत महत्त्वाचा वाटा उचलणार्‍या कसबा पेठ मतदारसंघातील भाजपच्या नगरसेवकांची अकार्यक्षमता या निकालाने चव्हाट्यावर आली आहे. नागरिकांची तुटलेली नाळ, भरकटलेले प्रश्न, यामुळे गृहीत धरलेल्या मतदारांनीच भाजपला धक्का दिल्याचे या निवडणूक निकालाने दाखवून दिले आहे.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात महापालिकेचे प्रभाग क्र. 15, 16, 17, 18 हे पूर्णपणे; तर प्रभाग 19 आणि 29 असे एकूण सहा प्रभाग येतात. या प्रभागांत भाजपचे एकूण 16 नगरसेवक होते, तर महाविकास आघाडीचे 8 असे संख्याबळ आहे. त्यात गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या सत्ताकाळात या मतदारसंघाला मुक्ता टिळक यांच्या रूपाने अडीच वर्षे महापौरपद, स्वत: उमेदवार हेमंत रासने यांना तीनवेळा स्थायी समिती अध्यक्षपद, धीरज घाटे आणि गणेश बिडकर यांच्या रूपाने सभागृह नेतेपद आणि विद्यमान खासदार गिरीश बापट हे कसबा पेठेतीलच.

असे असताना प्रभाग 15 चा अपवाद वगळता सर्वच प्रभागांत भाजप उमेदवार हेमंत रासने यांची पीछेहाट झाली. या निकालाने भाजपच्या या माजी नगरसेवकांची कार्यक्षमताच चव्हाट्यावर आली आहे. यामधील काही मोजक्या माजी नगरसेवकांचा अपवाद म्हणावा लागेल. मात्र, 2017 च्या मोदी लाटेत निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांची नाळ जनतेशी तुटली असल्याचे या निवडणुकीत प्रकर्षाने दिसून आले. मुळातच कसब्यात ‘वॉटर, गटर आणि मीटर’ या तीन प्रमुख प्रश्नांबरोबर वाहतूक आणि जुन्या वाड्यांचा प्रश्न महत्त्वाचा.

मात्र, वर्षानुवर्षे हे प्रश्न कायम असल्याचे दिसून आले. हे प्रश्न सोडविण्याऐवजी हे माननीय ‘स’ यादीच्या निधीतून सुशोभीकरण आणि पाट्या लावण्याच्या मागे अधिक धावले. नागरिकांना काय हवे, याची जाणच त्यांनी ठेवली नाही. त्यांना गृहीत धरून कामे होत गेली. ‘नदी स्वच्छ होतेय; पण आमच्या घराशेजारील गटार स्वच्छ होत नाही,’ ही नागरिकांची भावना या निवडणुकीत दिसली.

ती मतदारांनी ‘पुढारी’शी बोलताना व्यक्तही केली. विशेष म्हणजे, या माजी नगरसेवकांचा नागरिकांशी संपर्कच तुटला असल्याचे या निवडणुकीत दिसून आले. एका प्रभागातील एक माननीय तर तब्बल चार वर्षांनीच दिसत असल्याची प्रतिक्रिया प्रचारात उमटली. त्यामुळे या माजी नगरसेवकाला प्रचारात फिरू द्यावे की नाही, असा प्रश्न भाजप नेत्यांपुढे उभा राहिला होता. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याची कार्यक्षमताही या नगरसेवकांना दाखवता आली नाही.

Back to top button