

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ पोटनिवडणुकीत चौदाही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. या उमेदवारांना त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात येत असल्याची नोटीस शुक्रवारी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. नोटा पर्याय वगळता झालेल्या मतदानापैकी 16 टक्के मते मिळविणे आवश्यक होते. तो आकडा कसब्यात 22 हजार 800 एवढा होता.
म्हणजेच अनामत रक्कम वाचविण्यासाठी एवढी मते मिळविणे आवश्यक होते. मात्र, धंगेकर आणि रासने वगळता उर्वरित 14 उमेदवारांना 22 हजार 800 मते मिळविता आली नाहीत. त्यानुसार या 14 उमेदवारांना त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात येत असल्याची नोटीस पाठविण्याचे काम शुक्रवारी सुरू करण्यात आले, असेही किसवे-देवकाते यांनी सांगितले.
कसबा मतदारसंघात दोन लाख 75 हजार 717 मतदार आहेत. त्यापैकी एक लाख 36 हजार 980 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी 51.6 टक्के मतदान झाले होते, त्यापैकी धंगेकर यांना 73 हजार 309, तर रासने यांना 62 हजार 394 मते मिळाली. काँग्रेस, भाजपव्यतिरिक्त सैनिक समाज पक्षाचे तुकाराम डफळ यांना 153, प्रभुद्ध रिपब्लिक पार्टीचे बलजितसिंग कोचर यांना 51, राष्ट्रीय मराठा पक्षाचे रवींद्र वेदपाठक यांना 41 मते मिळाली. याशिवाय 11 अपक्षांना मिळून 1032 मते मिळाली. 22 मते बाद ठरली, तर 27 बनावट मतदान झाले.