पुणे: चायनीज खाण्यासाठी गेलेल्या युवकाचा डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू | पुढारी

पुणे: चायनीज खाण्यासाठी गेलेल्या युवकाचा डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू

येरवडा, पुढारी वृत्तसेवा: डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुणाच्या डोक्यावरून चाक गेल्यामुळे जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात रोहित विजयकुमार देवणे (वय 25, रा. महाराष्ट्र चौक,आळंदी रोड भोसरी) याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित हा त्याच्या मित्रांसोबत विमान नगर येथे चायनीज खाण्यासाठी गेलेला होता. त्याच्या मित्राची ऍक्टिव्हा दुचाकी क्रमांक (एम एच 15 एफ वाय 3822) वरून शास्त्रीनगर चौकातून जात असताना भारत बेन्झ कंपनीच्या हायवा डंपर (एम एच 12पी क्यू 4575)च्या डाव्या बाजूच्या मागील चाकाखाली आला. डंपरचे चाक डोक्यावरून गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर डंपर चालक फरार झाला. अचानक झालेल्या या भीषण अपघातामुळे शास्त्रीनगर चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या परिसरातील जड वाहनांची वाढती वाहतूक व त्यामुळे होणारे भीषण अपघात यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुंजन चौक, सादलबाबा चौक, शास्त्री चौक या तीन चौकात मागील एक महिन्यात झालेल्या तीन भीषण अपघातात दोन युवक तसेच एका महिलेचा मृत्यू झालेला आहे. वारंवार होणाऱ्या जीवघेण्या अपघातांच्या बाबत वाहतूक पोलीस तसेच महापालिका वाहतूक नियोजन विभाग यांच्याकडून कोणतीच उपायोजना करण्यात आलेली दिसून येत नाही. या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

Back to top button