पिंपरी : …अन् डोळ्यांत तरळले अश्रू | पुढारी

पिंपरी : ...अन् डोळ्यांत तरळले अश्रू

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील स्मृतिस्थळाला भेट दिल्यानंतर चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी ठरलेल्या अश्विनी जगताप आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या रेणुसे यांना गहिवरून आले. तसेच, त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. दिवंगत आमदार जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या जागेवर भाजप-शिवसेना युतीकडून दिवंगत आमदार जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी निवडणूक लढविली.

या निवडणुकीत त्यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेत विजयश्री खेचून आणली. त्यानंतर त्या दिवंगत आमदार जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील स्मृतीस्थळाला भेट देण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यांची मुलगी ऐश्वर्या रेणुसे हिचे डोळेही पाणावले. या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, माजी महापौर माई ढोरे, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आदी उपस्थित होते.

बारणे म्हणाले, भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या माध्यमातुन यापुढे चांगले काम होईल. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे राहिलेले काम अश्विनी जगताप पूर्ण करतील. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत झालेल्या तिहेरी लढतीत दुसर्‍या उमेदवाराला मते गेली. अन्यथा, यापेक्षाही जास्त मताधिक्य जगताप यांना मिळाले असते. आमदार महेश लांडगे, शंकर जगताप यांनी कार्यकर्त्यांची मोट बांधली. जनतेने पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीवर विश्वास टाकला. त्यामुळेच हा विजय मिळविता आला.

Back to top button