पुणे : राजगुरूनगर शहरात पार्किंग झोन वापराचे नागरिकांना आवाहन | पुढारी

पुणे : राजगुरूनगर शहरात पार्किंग झोन वापराचे नागरिकांना आवाहन

राजगुरूनगर: पुढारी वृत्तसेवा: पोलीस प्रशासन आणि राजगुरूनगर नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात नो पार्किग झोन तयार करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून नागरिकांनी या झोन प्रमाणे वाहने पार्किंग करावीत असे आवाहन खेड पोलिसांकडून करण्यात आले आहे.

राजगुरूनगर शहरात रोज वाहतूक कोंडी होत असते. त्यात पुणे नाशिक महामार्ग ते प्रांत कार्यालय हा राजगुरूनगर- भिमाशंकर रस्ता, न्यायालयालगतचा रस्ता, तिन्हेवाडी रस्ता या ठिकाणी दररोज मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यावर उपाय योजना म्हणून  शहरामध्ये राजगुरूनगर नगरपरिषदेच्या माध्यमातून व पोलिसांच्या सहकार्याने पार्किंग झोन तयार करण्यात आला आहे.

या झोन नुसार शहरामध्ये नो पार्किंगसाठी जागा तयार करणेत आलेली आहे. त्यानुसार ज्या ठिकाणी नगरपरिषदेने वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध करुन दिलेली आहे. त्याच ठिकाणी नागरिकांनी वाहने पार्क करावीत. अन्यथा नो पार्किंग नुसार दंड आकारण्यात येणार आहे. त्यानुसार गुरुवारी (दि २) पोलीस वाहतुक विभागाने एकुण १३७ वाहनांवर कारवाई केली. या दंडात्मक कारवाईत पहिल्याच दिवशी तब्बल ७८ हजार रुपये दंड आकारण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी दिली.

पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घटटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस पथकाने ही कामगीरी केली. याबाबत शहरातील व बाहेरगावच्या परिसरातील नागरिकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. राजगुरूनगर शहरामध्ये वाहतुक कोंडीला आळा बसणार असल्याने नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

Back to top button