इंदापुरात 5 शेतकर्‍यांकडून सामूहिक अफूची शेती | पुढारी

इंदापुरात 5 शेतकर्‍यांकडून सामूहिक अफूची शेती

भिगवण; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील पाच शेतकर्‍यांनी थेट सामूहिक अफूची शेती केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. 2) दुपारी उघडकीस आला. अंदाजे दीड एकर क्षेत्रावर ही अफूची झाडे असून, त्यांची एकूण किंमत व अफूची लागवड करणार्‍या शेतकर्‍यांची नावे अद्यापी समजू शकली नाहीत. रात्री उशिरापर्यंत इंदापूर पोलिसांकडून या अफूच्या शेतीची पाहणी सुरू होती.
तालुक्यातील पळसदेव, माळवाडी आणि शेलारपट्ट्यातील पाच शेतकर्‍यांनी मक्याच्या पिकात आंतरपीक म्हणून थेट सामूहिक अफूची शेती केली. विशेष म्हणजे या अफूची पूर्ण वाढ झाली असून, त्याची बोंडेदेखील वर आली आहेत.

मात्र, तरीही ही अफूची शेती कोणाच्याच नजरेस पडली नाही. दरम्यान, पोलिसांना गुरुवारी (दि. 2) दुपारी या शेतीचा सुगावा लागला आणि तब्बल दीड एकरातील ही अफूची शेती आढळून आली आणि एकच खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत इंदापूर पोलिस या शेतीची पाहणी करीत होते. या अफूची एकूण किंमत किती होईल याचा आकडा उद्या (दि. 3) कळण्याची शक्यता आहे. यापैकी पळसदेवनजीकच्या मक्याच्या शेतात आंतरपीक म्हणून केलेली अफूची शेती ही पोलिसांचेही डोळे विस्फारणारी ठरली. संबंधित शेतकर्‍यांना ही अफूची शेती चांगलीच महाग पडण्याची शक्यता आहे.

Back to top button