कोंढवा; पुढारी वृत्तसेवा : काळेपडळ येथे गुरुवारी रेल्वेलाईनच्या परिसरातील विजेच्या डीपीजवळ असलेल्या कचर्याला अज्ञात व्यक्तीने आग लावली. यामुळे वीज वाहिनीने पेट घेतला. अग्निशामक दल व विद्युत कर्मचार्यांनी वेळीच ही आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. महंमदवाडी काळेपडळ रेल्वे गेटशेजारी सत्यराज सिटी सोसायटीसमोरील विजेच्या डीपीजवळ टाकण्यात आलेल्या कचर्याला ही आग लावण्यात आली होती. यामुळे वीजवाहिनीने पेट घेतल्याने स्फोट होऊन मोठा आवाज झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत अग्निशामक दल व महावितरण कंपनीला माहिती देण्यात आली. त्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली.
अग्निशामक दलाचे तांडेल तानाजी गायकवाड, फायरमन स्वप्नील ठुले, आकाश पवार, कुंडलिक कराले, सतीश जगताप व महावितरणचे प्रकाश शेंडगे, मजहर इनामदार, सचिन आंबुरे यांनी ही आग आटोक्यात आणली. दरम्यान, कोंढवा, महंमदवाडी, सय्यदनगर, उंड्री परिसरात अनेकवेळा कचरा जाळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. नागरिकांनी कचर्याला आग लावू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.