खडकवासला : प्रसंगावधानाने वाचला युवकाचा जीव; दुभाजकाच्या खड्ड्यामुळे अपघात | पुढारी

खडकवासला : प्रसंगावधानाने वाचला युवकाचा जीव; दुभाजकाच्या खड्ड्यामुळे अपघात

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : नांदेड फाट्याजवळ गुरुवारी सकाळी मुख्य पुणे-पानशेत रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकासाठी ठेवलेल्या खड्ड्यातून दुचाकी घसरून थेट समोर येणार्‍या पीएमपी बस खाली पडली. युवकाने प्रसंगावधन राखत तातडीने दुचाकीवरून उडी मारल्याने त्याचे प्राण वाचले. मात्र, या अपघातात तो जखमी झाला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर जखमी युवकाच्या भावाने बसवर दगडफेक केली. या प्रकरणी हवेली पोलिस तपास करत असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. करण गुरुदत्त वाघमारे (वय 27, रा. कोल्हेवाडी, खडकवासला), असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. पीएमपीची बस पुण्याकडून खानापूर, रांजणेकडे जात होती. त्या वेळी पुण्याकडे दुचाकीवरून जाणार्‍या करणची दुचाकी दुभाजकाच्या खड्ड्यातून घसरून थेट समोरून येणार्‍या पीएमपी बसच्या पुढील चाकाखाली गेली.

खाली कोसळताच करण याने उडी मारल्याने त्याचे प्राण वाचले. बसचालक भरत झुरंगे यांनी तत्काळ बस थांबवली. खडकवासला मनसेचे उपाध्यक्ष रमेश करंजावणे म्हणाले, ‘नांदेड फाटा ते किरकटवाडी फाट्यापर्यंत रस्त्याच्या मधोमध दुभाजकासाठी एक ते दीड फूट रुंदीची मोकळी जागा ठेवली. या खड्ड्यात वाहने कोसळून अपघात होत आहेत. यामुळे हे काम तातडीने पूर्ण करावे.’ सहायक फौजदार दिलीप शिंदे व पोलिस नाईक अशोक तारु यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Back to top button