धायरी : निधी येतो-जातो, पण काम होत नाही! डीपी रस्त्याचे काम रखडले | पुढारी

धायरी : निधी येतो-जातो, पण काम होत नाही! डीपी रस्त्याचे काम रखडले

धायरी; पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुकमधील राष्ट्रीय महामार्ग ते पाऊंजाई मंदिर, धबाडी आणि सिंहगड कॉलेज रस्ता दरम्यानच्या अठरा मीटर डी. पी. रस्त्याचे काम रखडले आहे. मूळ जागामालकांनी अजून जागा महापालिकेच्या ताब्यात दिली नसल्यामुळे भूसंपादन प्रक्रियादेखील अद्याप पूर्ण झाली नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

या रस्त्याच्या कामासाठी 2016-17 मध्ये निधीची तरतूद करण्यात आली होती. परंतु, महापालिकेच्या ताब्यात जागा न आल्यामुळे हा निधी माघारी गेला होता. परिसरातील नाल्यावर कलव्हर्ट बांधणेदेखील अद्याप बाकी आहे. दरम्यानच्या काळात या रस्त्यावर अनेक अनधिकृत बांधकामे झाली आहेत. या रस्त्याची लांबी नऊशे मीटर, तर रुंदी अठरा मीटर आहे.

सध्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे जागामालकांना रोख स्वरूपात मोबदला देता येणे शक्य नाही. यामुळे त्यांना टीडीआर किंवा एफएसआय स्वरूपातच मोबदला देण्यात येणार असल्याचे सूत्रांंनी सांगितले. या रस्त्यासाठी अद्यापही भूसंपादन झालेल्या नागरिकांना या रस्त्याची प्रतीक्षा आहे.

वडगाव बुद्रुक परिसरातील डी. पी. रस्त्यास महापालिकेची मंजुरी मिळाली आहे. मात्र, जागामालक त्यांच्या नावावर सातबारा उतारा नसतानासुद्धा हा रस्ता होऊन देत नाहीत. हरी ओम अपार्टमेंट, शीतला अपार्टमेंट, चैतन्य अपार्टमेंट या इमारतींना महापालिकेने डी. पी. रस्त्यामुळे मंजुरी दिली आहे. तरीसुद्धा या रस्त्यावर अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत.
                                                     – अजिंक्य सोमवंशी, नागरिक

राष्ट्रीय महामार्ग ते स्व. अटलबिहारी वाजपेयी शाळा, पाऊंजाई मंदिर, धबाडीमार्गे सिंहगड कॉलेज या डी. पी. रस्त्याचे काम लवकर होण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा सुरू आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये ओढ्यावरती पूल बांधणे व रस्त्याच्या कामासाठी एक कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाला निवेदन दिले आहे.

                                            – हरिदास चरवड, माजी नगरसेवक.

धबाडी परिसरात अरुंद रस्ते असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. रुग्णवाहिका व अग्निशमन दलाची गाडीदेखील या रस्त्यांवरून सहजासहजी जाऊ शकत नाही. यामुळे डी. पी. रस्ता लवकर होणे गरजेचे आहे. या रस्त्यात आमची जागा जात असून, लोकहितासाठी महापालिकेला सहकार्य केले जाईल.

                                                 – अतुल दांगट, जागामालक

महापालिका प्रशासनाकडून या रस्त्यासाठी लवकरात लवकर भूसंपादन केले जाईल. त्यानंतर या रस्त्याच्या कामासाठी निधीची तरतूद उपलब्ध झाल्यानंतर हे काम सुरू करणे शक्य होईल.
                                                             – नरेश रायकर,
                                           उपअभियंता, पथ विभाग महापालिका

Back to top button