पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या तोंडचा घास कलाटेंच्या बंडखोरीमुळे हिरावला | पुढारी

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या तोंडचा घास कलाटेंच्या बंडखोरीमुळे हिरावला

किरण जोशी :

पिंपरी : मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्री, वरिष्ठ नेत्यांची फौज, स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत केलेला कसून प्रचार आणि सहानुभूतीच्या लाटेवर चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप या मताधिक्याने विजयी झाल्या; मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने एकटवलेल्या महाविकास आघाडीचा आत्मविश्वासही व्दिगुणित झाला आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे झालेल्या या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. महापालिकेच्या रूपाने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भाजपने काबीज केल्यानंतर आणि मावळ लोकसभेत पार्थ पवार यांचा पराभव झाल्यानंतर अस्वस्थ असलेल्या अजित पवार यांनी पिंपरी- चिंचवडच्या राजकारणात जाणीवपूर्वक लक्ष घातले. त्यामुळेच त्यांनी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करीत उमेदवार देण्याची घोेषणा दिली.

राष्ट्रवादीकडून तब्बल 11 जण इच्छुक होते. शिवसेनेचे राहुल कलाटे हेदेखील महाविकास आघाडीकडून इच्छुक होते. राष्ट्रवादीकडून नाना काटे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचे निश्चित केले. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार, हे स्पष्ट झाले होते. आ. जगताप यांनी शेवटच्या श्वासापर्यंत भाजपसाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना विजयी करण्याचे आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर होते.

केवळ सहानुभूतीच्या मुद्द्यावर निवडणूक लढता येणार नाही, हे लक्षात आल्यानंतर भाजपकडून तब्बल 25 स्टार प्रचारकांची फळी उतरविण्यात आली. मंत्री, वरिष्ठ नेत्यांच्या सभा, आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले. दुसरीकडे राष्ट्रवादीनेही माजी मंत्री, स्टार प्रचारकांना चिंचवडवमध्ये धाडले. मित्रपक्ष म्हणून त्यांना साथ देण्यासाठी नाना पटोले, आदित्य ठाकरेही सामील झाले. परिणामी, पोटनिवडणूक हायटेंशन मोडवर गेली.

बंडखोरीचा राष्ट्रवादीला फटका
गतवेळी आ. लक्ष्मण जगताप यांना काट्याची टक्कर देत दुसर्‍या क्रमांकावर राहिलेले राहुल कलाटे यांनी बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. अजित पवार यांनी अनेकदा याबद्दल नाराजीही व्यक्त केली. कलाटे यांनीही स्मार्ट प्रचार करीत आघाडी घेतली होती. तोडीस-तोड प्रचार झाल्याने प्रचंड चुरस निर्माण झाली. राहुल कलाटे यांना अनेकांचा छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जात होतो. याचा त्यांना फायदा होणार की मतविभागणी होऊन इतर कुणाला फटका बसणार, याबाबत उत्सुकता होती. कलाटे आणि काटे यांना मिळालेली एकूण मते अश्विनी जगताप यांच्यापेक्षा जास्त असल्याने बंडखोरीचा राष्ट्रवादीलाचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच अजित पवार यांनी निकालानंतरही कलाटेंच्या बंडखोरीवर स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली.

राज्याच्या राजकारणावर परिणाम
भाजपचा मोठ्या फरकाने विजय झाला असला, तरी या निकालामुळे महाविकास आघाडीच्या स्थानिक आणि राज्यातील नेत्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. लक्ष्मण जगताप यांच्यासारख्या ताकदीच्या लोकप्रतिनिधींच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना निवडून आणण्यासाठी भाजपला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली आणि या निमित्ताने महाविकास आघाडी एकदिलाने एकत्र आली. विजय मिळविता आला नसला, तरी भाजपला बॅकफुटवर आणल्याने आगामी महापालिका, विधानसभा निवडणुकीत भाजपासमोर आव्हान उभे करणे कठीण नाही, अशी भावना महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे.

Back to top button