पुणे : जनतेचा राग मतांमधून व्यक्त; रवींद्र धंगेकर यांची विजयानंतर प्रतिक्रिया | पुढारी

पुणे : जनतेचा राग मतांमधून व्यक्त; रवींद्र धंगेकर यांची विजयानंतर प्रतिक्रिया

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाने प्रशासन, पैसा आणि गुंडगिरीचा मोठ्या प्रमाणात वापर केला. ही निवडणूक हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग जनतेमध्ये होता. तो मतदानाच्या रूपातून व्यक्त झाला आणि पैशांच्या धुरात भाजप-शिंदे सरकारच जळून खाक झाले,’ अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली.

पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी व काँग्रेस भवन, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना कार्यालयात बोलताना धंगेकर म्हणाले, ’शरद पवार, अजित पवार, आदित्य ठाकरे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी माझ्या विजयाचा मार्ग सुकर केला. गेल्या पंधरा दिवसांपासून भाजप व शिंदे गटाकडून पुण्यात पैशांचा पाऊस पाडला गेला.

अत्यंत चुकीच्या पद्धतीने ही पोटनिवडणूक हाताळली गेली व पैशांचे राजकारण केले गेले. त्यामुळे भविष्यात भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता उमेदवार म्हणून उभा राहिल्यास त्याच्यापुढे मोठे संकट निर्माण होणार आहे. ही निवडणूक हुकूमशाहीकडे नेण्याचे काम मुख्यमंत्री व भाजपच्या नेत्यांनी केले. त्याविरोधात मी कसबा गणपती मंदिरासमोर उपोषण केले. जनतेच्या दरबारात मला न्याय मिळाला.’

या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी आपण स्वतःच उमेदवार आहोत, असे समजून एकदिलाने काम केले, असेही ते म्हणाले. ‘उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचे महाविकास आघाडीचे सरकार भाजपने कुरघोड्या करून पायउतार केले. कसब्यातील हा विजय महाविकास आघाडीच्या विजयाची नांदी आहे. येत्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देतील,’ असा विश्वास धंगेकर यांनी व्यक्त केला. तसेच सर्व मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता मी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न व काम करीन, असेही ते म्हणाले.

‘मी रवींद्र धंगेकर….’
पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘हू इज धंगेकर’ असा अवमानास्पद प्रश्न करत धंगेकर यांना
अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत विचारणा केली असता, ‘मी रवींद्र धंगेकर’ असे खोचक पुणेरी उत्तर धंगेकर यांनी दिले.

केसरीवाड्याला भेट; मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार
कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजयी मिरवणुकीदरम्यान केसरीवाड्याला भेट दिली. धंगेकर यांनी मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा आणि टिळकांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी शैलेश टिळक यांच्या घरी जाऊन दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या वेळी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांच्यासह मुलगा कुणाल टिळक, काँग्रेस नेते रोहित टिळक यांच्यासह राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी आदी उपस्थित होते.

Back to top button