मंचर : बनावट लग्न करणार्‍या टोळीकडून ऐवज हस्तगत | पुढारी

मंचर : बनावट लग्न करणार्‍या टोळीकडून ऐवज हस्तगत

मंचर(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : भराडी येथे लग्नाचा बनाव करून लग्नानंतर पळून जाण्याच्या तयारीत असणार्‍या वधू आणि तिच्या सहकारी आरोपीकडून 55 हजार रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली, अशी माहिती पारगावचे पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली. पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 दिवसांपूर्वी विवाह झाल्यानंतर त्यानंतरच्या आठ दिवसांतच पैसे आणि दागिने घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या नववधूसह तिचे सहकारी आणि टोळीला पारगाव पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचून मंचर येथून अटक केली होती. या प्रकरणी नववधूसह एक महिला, दोन पुरुष यांना ताब्यात घेतले होते. एकूण सहा जणांविरुद्ध पारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

लता अविनाश कोटलवार (वय 51), मनोज अविनाश कोटलवार (वय 24, सध्या रा. इंदिरानगर, आळंदी, ता. खेड, मूळ रा. नांदेड), यास्मीन अन्वर बेग (वय 27, रा. डी बंगला चौक, शिवाजीनगर, पुणे), गणपत हांबू वाळुंज, वसंत किसन थोरात (दोघेही रा. मंचर, ता. आंबेगाव) आणि वैशाली मोरे (रा. पुणे, पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्याविरुध्द तरुणाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून आता 55 हजार रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार ही मालमत्ता फिर्यादी गणेश बंडू बांगर यांना पारगावचे पोलिस निरीक्षक लहू थाटे व त्यांच्या टीमने पुन्हा मिळवून दिली. या गुन्हाचा तपास पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे करीत आहेत.

Back to top button