पुणे : पाणी नियोजनासाठी 15 मार्चला बैठक | पुढारी

पुणे : पाणी नियोजनासाठी 15 मार्चला बैठक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहराला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागाला शेतीसाठी उन्हाळ्यात देण्यात येणार्‍या पाण्याचे नियोजन करण्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक 15 मार्चला होणार आहे. या बैठकीत धरणांमधील उपलब्ध पाण्याचे 15 जुलैपर्यंतचे नियोजन करण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांत मिळून एकूण 18.58 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. यापूर्वी केलेल्या नियोजनानुसार रब्बी हंगामासाठी ग्रामीण भागातील शेतीसाठी 25 डिसेंबर 2022 ते 6 फेब—ुवारी 2023 या कालावधीत 3.81 टीएमसी पाणी सोडण्यात आले.

याबाबत खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील म्हणाले, ’पावसाळा संपल्यानंतर झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केलेल्या नियोजनानुसार रब्बी हंगामासाठी कालव्यातून पाणी सोडण्यात आले. आता उन्हाळ्यात दोन आवर्तने घेण्याचे नियोजन आहे. त्यानुसार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची तत्त्वत: मान्यता घेऊन पहिले उन्हाळी आवर्तन बुधवारपासून (1 मार्च) सुरू करण्यात आले आहे.

धरणांमधील साठा
धरण टीएमसी टक्के
टेमघर 0.45 12.15
वरसगाव 10.23 79.80
पानशेत 6.91 64.79
खडकवासला 0.99 49.97
एकूण 18.58 63.73

Back to top button