पुणे : सर्वाधिक गैरप्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये | पुढारी

पुणे : सर्वाधिक गैरप्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बारावीच्या परीक्षा कालावधीत कॉपीमुक्त अभियान राबविले जात असले, तरी गैरप्रकार रोखता आलेले नाहीत. सर्वाधिक गैरप्रकार हे छत्रपती संभाजीनगर विभागात झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 51, तर पुणे विभागात 29 गैरप्रकारांची नोंद झाली आहे. राज्य मंडळाचे शरद गोसावी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

छत्रपती संभाजीनगर , पुण्याबरोबरच अमरावती आणि नाशिक येथे प्रत्येकी चार, मुंबई येथे तीन, लातूर येथे सहा गैरप्रकारांची नोंद झाली. दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियानांतर्गत काटेकोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, या परीक्षांमध्ये गैरप्रकार सुरूच असल्याचे निदर्शनास आले आहे. मंगळवारपर्यंत बारावीच्या परीक्षेतील 59 विषयांच्या परीक्षा झाल्या. त्यात 111 गैरप्रकारांची नोंद झाली आहे.

गोसावी म्हणाले, गैरप्रकार केलेल्या विद्यार्थ्यांची त्या विषयाची संपादणूक रद्द केली जाते. प्रत्येक वर्षी छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये गैरप्रकारांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. मराठवाड्यातील शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये भौतिक सुविधा मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याशिवाय मानसिकता हादेखील महत्त्वाचा भाग आहे.

दौंडच्या प्रकाराची चौकशी होणार
पुण्यातील दौंड येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार उघडकीस आला. या प्रकारात विद्यार्थ्यांना मदत करणार्‍या शिक्षकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, याबाबत गोसावी म्हणाले, या प्रकारात विद्यार्थी हे परीक्षाकक्षात साहित्य घेऊन गेले होते. तसेच काही साहित्य बाहेर टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे केंद्र संचालक, केंद्र उपसंचालकांनी आपली जबाबदारी पार पाडलेली नाही. या प्रकाराची चौकशी पुणे विभागीय मंडळामार्फत करून कारवाई करण्यात येईल. तसेच पथकाने केंद्राला भेट दिली असता, केंद्रप्रमुख उपस्थित नव्हते, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे नियमानुसार दोषींवर कारवाई केली जाईल.

प्रश्नपत्रिकेतील चुकांबद्दल मंडळाकडून दिलगिरी

बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चूक झाली. ती चूक मंडळाने मान्य केली असून, याबद्दल राज्य मंडळाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. अशाप्रकारांमुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये मंडळाबद्दल असलेल्या विश्वासार्हतेला तडा जाऊ शकतो अशी कबुली मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

बारावीच्या पहिल्याच इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नांऐवजी उत्तर छापून आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. हे प्रकार वारंवार घडत असल्याने मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याविषयी गोसावी म्हणाले, या चुकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाईल. इंग्रजी विषयाच्या गुणांचा निर्णय मुख्य नियामकांच्या अहवालानंतर घेण्यात येईल. प्रश्नपत्रिकेत चूक होणार नाही, यासाठी मंडळाकडून विशेष खबरदारी घेतली जाते. त्याची मोठी प्रक्रिया आहे. इंग्रजी प्रश्नपत्रिकेतील चूक ही छपाईची की संपादनाची हे लवकरच समोर येईल. छपाईमध्ये चूक झाली असेल, तर संबंधित मुद्रणालयास मोठा दंड आकारण्याची तरतूद मंडळाच्या नियमावलीत आहे.

निकालास विलंब होणार नाही
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षक संघटनेने टाकलेला बहिष्कार मागे घ्यावा यासाठी मंडळाकडून विनंती केली आहे. शिक्षणमंत्र्यांनी बैठकीत दिलेल्या आश्वासनाचे इतिवृत्त मिळावे, अशी संघटनेची मागणी आहे. शिक्षणमंत्र्यांची प्रकृती ठकी नसून, ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे या बहिष्कारामुळे निकालास विलंब होणार नाही, असे गोसावी यांनी स्पष्ट केले.

Back to top button