पुणे : एनडीएमध्ये नोकरीच्या आमिषाने चौघांची फसवणूक | पुढारी

पुणे : एनडीएमध्ये नोकरीच्या आमिषाने चौघांची फसवणूक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) क्लार्कपदावर नोकरी लावण्याबरोबरच इलेक्ट्रिक वर्क टेंडर मिळवून देण्याच्या बतावणीने चौघांची 28 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी प्रसाद गोविंद वझे (लक्ष्मी पार्क सोसायटी, खडकमाळ, कोंढवे धावडे), परमेश्वर अंकुश शिंदे (रा. ब्र ह्मा हॉटेलसमोर, सिंहगड रोड) या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विजय साखरे (वय 42, रा. भूमकर चौक, नर्‍हे) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना मे ते 15 ऑक्टोबर 2022 या कालावधीत घडला.

याबाबत सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण जाधव यांनी सांगितले, फिर्यादी साखरे हे इलेक्ट्रिक अभियंते आहेत. तसेच त्यांच्या टुरिस्ट गाड्यादेखील आहेत. तर आरोपी शिंदे याचा टुरिस्टचा व्यवसाय आहे. त्यातूनच दोघांचा परिचय झाला होता. शिंदे याने त्याच्या
ओळखीची व्यक्ती वझे याच्या मोठ्या ठिकाणी ओळखी असून, तो एनडीएमध्ये क्लार्कपदावर कायमस्वरूपी नोकरी लावतो. तसेच तो तेथील वर्क टेंडरदेखील पास करून देतो, अशी बतावणी केली. सुरुवातीला साखरे यांनी याकडे दुर्लक्ष केले.

मात्र, शिंदे याने साखरे यांच्या पत्नीला नोकरी लावू, असे सांगितले. त्याला साखरे बळी पडले. एका व्यक्तीच्या नोकरीसाठी आठ लाख रुपये वझे याने मागितले. त्यानुसार साखरे हे पैशाची जमवाजमव करण्यासाठी केज तालुक्यातील आपल्या गावी नातेवाइकाकडे गेले होते. नातेवाइकांनीसुद्धा आमच्या मुलांना नोकरी लावा, असे सांगून वझे याच्याकडे पैसे दिले. साखरे व त्यांचे इतर तीन नातेवाईक यांच्याकडून वझे आणि शिंदे याने ऑनलाइन व रोख असे 28 लाख रुपये घेतले.

याचवेळी साखरे यांना एनडीएमधील इलेक्ट्रिक वर्क टेंडर मिळून देण्याचेसुद्धा प्रलोभन दाखविण्यात आले. दरम्यान, पैसे दिल्यापासूनदेखील नोकरी लागत नाही हे लक्षात आल्यानंतर साखरे यांनी शिंदे व वझे यांच्याकडे पैसे मागितले. मात्र, त्यांनी उडवाडवीची उत्तरे दिली. एकेदिवशी तर वझे हा फोन बंद करून फरार झाला. तर शिंदे याने ‘तुमचे तुम्ही पाहा, असे सांगून अंग काढून घेतले. त्यानंतर दोघे पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर साखरे यांनी याबाबत सिंहगड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साखरे यांच्या इतर तिघा नातेवाइकांनी तर आपल्या मुलाला-मुलीला नोकरी मिळेल म्हणून जमिनी गहाण ठेवून दोन्ही ठगांच्या हवाली पैसे केले आहेत.

Back to top button