पुणे : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट लक! आजपासून परीक्षेला सुरूवात | पुढारी

पुणे : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट लक! आजपासून परीक्षेला सुरूवात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी दहावीची परीक्षा गुरुवारपासून (दि. 2) सुरू होत आहे. सलग तीन वर्षांपासून दहावीच्या विद्यार्थिसंख्येत घट होत असून, गत वर्षापेक्षा यंदा 61 हजार 708 विद्यार्थी कमी झाले आहेत. या वर्षी 23 हजार 10 शाळांतील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर आदी उपस्थित होते. राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांच्या वतीने 2 ते 25 मार्च या कालावधीत लेखी परीक्षा होत आहे. नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 8 लाख 44 हजार 116 विद्यार्थी आणि 7 लाख 33 हजार 67 विद्यार्थिनींनी नोंदणी केली आहे. तसेच, 8 हजार 189 दिव्यांग, तर 73 तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 23 हजार 10 माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी 5 हजार 33 मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार आहे.

गोसावी म्हणाले की, बारावीप्रमाणे दहावीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक असेल. यंदा शंभर टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होईल. बारावीप्रमाणेच दहावीला वाढीव दहा मिनिटे मिळतील. पालक, विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांतील वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये. मंडळाने प्रसिद्ध केलेले अधिकृत वेळापत्रकच ग्राह्य धरावे.

विद्यार्थ्यांना परीक्षेचे नैराश्य येऊ नये म्हणून समुपदेशकांची नियुक्ती केली आहे, असे गोसावी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिका दहा मिनिटे अगोदर देण्याची प्रथा बंद झाली आहे. परीक्षेची निर्धारित वेळ संपल्यानंतर दहा मिनिटांचा जादा अवधी विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. यंदा राज्य शासनाकडून बोर्डाच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असल्याचे गोसावी यांनी सांगितले.

अशी झाली विद्यार्थ्यांमध्ये घट

मार्च 2020 : 17 लाख 65 हजार 829
मार्च 2021 : 16 लाख 58 हजार 614
मार्च 2022 : 16 लाख 38 हजार 964

विभागनिहाय विद्यार्थिसंख्या

पुणे : 2 लाख 68 हजार 200

नागपूर : 1 लाख 53 हजार 519

औरंगाबाद : 1 लाख 80 हजार 538

मुंबई : 3 लाख 52 हजार 480

कोल्हापूर : 1 लाख 30 हजार 653

अमरावती : 1 लाख 60 हजार 370

नाशिक : 1 लाख 97 हजार 206

लातूर : 1 लाख 5 हजार 834

कोकण : 28 हजार 456

राज्य मंडळाच्या अध्यक्षांचा अजब दावा
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष गोसावी यांनी सांगितले. त्यावर पत्रकारांनी याचे कारण विचारले असता, आयसीएसई माध्यमाच्या शाळांकडे असणारा विद्यार्थ्यांचा कल हे एक कारण आहे. तसेच, पालकांकडून कमी अपत्यांचा घेतला जाणारा निर्णय, यामुळे विद्यार्थिसंख्या घटल्याची कारणे असू शकतात, असा अजब दावा गोसावी यांनी केला

Back to top button