कसबा पेठ, चिंचवडची आज मतमोजणी; निकालाची उत्सुकता शिगेला | पुढारी

कसबा पेठ, चिंचवडची आज मतमोजणी; निकालाची उत्सुकता शिगेला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या मतदारसंघांतील पोटनिवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे मोठ्या उत्सुकतेने लक्ष लागले आहे. दोन्ही मतदारसंघांतील मतमोजणीला गुरुवारी (दि. 2) सकाळी प्रारंभ होत असून, दुपारपर्यंत कल स्पष्ट होईल. भाजपच्या ताब्यातील हे मतदारसंघ विरोधकांनी जिंकल्यास, राज्याच्या राजकारणावर त्याचे तीव्र पडसाद उमटतील. रविवारी मतदान झाल्यानंतर, दोन्ही पक्षांकडून विजयाचे दावे ठोकण्यात आले आहेत.

भाजप सहजपणे दोन्ही जागा जिंकेल, अशी स्थिती प्रारंभी असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ताकद पणाला लावल्याने दोन्ही मतदारसंघांतील लढती प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अटीतटीच्या ठरल्या. मतदान रविवारी झाल्यानंतर, दोन्ही पक्षांकडून विजयाचे दावे ठोकण्यात आले. निष्पक्षपणे निवडणुकीचे अंदाज बांधणार्‍यांनाही नक्की कोण निवडून येईल, ते सांगता येणार नाही, एवढी चुरस या निवडणुकीत निर्माण झाली आहे.

कसबा पेठेत भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात मुख्य थेट लढत रंगली आहे. या लढतीत एकूण सोळा उमेदवार आहेत. मतदारसंघात एक लाख 38 हजार मतदारांनी (50.06 टक्के) मतदान केले. मतमोजणीच्या एकूण वीस फेर्‍या होणार आहेत.
चिंचवड मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे की अपक्ष राहुल कलाटे यांच्यापैकी कोण विजयी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. थेरगावला मतमोजणी होणार आहे. चिंचवडला दोन लाख 87 हजार 479 मतदारांनी (50.53 टक्के) मतदान केले. मतमोजणीच्या 37 फेर्‍या होणार असून, अंतिम निकाल सायंकाळनंतर हाती येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सह भाजपच्या अनेक नेत्यांनी दोन्ही मतदारसंघांत झंझावाती प्रचार केला. शेवटच्या टप्प्यात फडणवीस यांची प्रचार फेरी, तसेच प्रचाराच्या सांगतेला शिंदे यांची प्रचार फेरी ही भाजपच्या प्रचाराच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली.

महाविकास आघाडीच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी पोटनिवडणुकीत प्रचार केल्याने राजकीय वातावरण तापले. विरोधकांनी केलेल्या आक्रमक प्रचाराने निवडणुकीतील चुरस वाढली.

निवडणुकीत कोण विजयी होणार?

निवडणुकीत कोण विजयी होणार, याचे अंदाज सध्यातरी कोणाला निश्चितपणे सांगता येत नाहीत. भाजपने दोन्ही मतदारसंघ राखल्यास, त्याचा भाजपला चांगला फायदा होईल. मात्र, एखादा मतदारसंघ विरोधकांनी जिंकल्यास, महाविकास आघाडीला आगामी महापालिका निवडणुकीसाठी त्याचा निश्चित फायदा होईल. विरोधकांचे मनोधैर्य वाढेल. राज्याच्या राजकारणातही त्याचे पडसाद उमटतील.

Back to top button