जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी 14 मार्चपासून बेमुदत आंदोलन | पुढारी

जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी 14 मार्चपासून बेमुदत आंदोलन

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्यातील विविध शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी 14 मार्चपासून राज्यभर बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांना माहिती व्हावी यासाठी विविध शासकीय कार्यालयावर व्दारसभा घेण्यात येत आहेत.

मध्यवर्ती इमारत सेंट्रल बिल्डिंग येथे द्वारसभा घेण्यात आली. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा पुणे, राज्य सरकारी गट चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ पुणे आणि विविध खाते निहाय संघटनेचे अध्यक्ष सरचिटणीस व पदाधिकारी संघटना कार्यकर्ते उपस्थित होते. 14 मार्च रोजी होणारा राज्यव्यापी बेमुदत संपाबाबत ज्येष्ठ कामगार नेते रमेशभाई आगवणे, मध्यवर्ती शासकीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मारुती शिंदे, शिक्षण विभाग अध्यक्ष नाना वाघ, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे पुणे जिल्हा विभागीय उपाध्यक्ष दिनेश दादा कुचेकर, चतुर्थीश्रेणी कर्मचारी महासंघ अध्यक्ष कृष्णा साळवी यांनी आपले विचार उपस्थित लोकांसमोर मांडले. संपातील महत्त्वाची मागणी असलेली ‘एकच मिशन, जुनी पेन्शन योजना’ जोपर्यंत सर्व कर्मचार्‍यांना लागू होणार नाही, तोपर्यंत बेमुदत संप मागे घेतला जाणार नाही, असा निर्धार करण्यात आला.

Back to top button