पुणे : किरकटवाडी, नांदेड भागातील दुर्गंधी होणार दूर ; महापालिकेकडून ओढ्यात औषध फवारणी | पुढारी

पुणे : किरकटवाडी, नांदेड भागातील दुर्गंधी होणार दूर ; महापालिकेकडून ओढ्यात औषध फवारणी

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : किरकटवाडी, नांदेड येथील ओढ्यातून वाहणार्‍या मैलापाणी, सांडपाण्याच्या दुर्गंधीने हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत दै. ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने ओढ्यांची पाहणी करून दुर्गंधीचा त्रास कमी करण्यासाठी औषध फवारणी सुरू केली आहे. दाट लोकवस्त्या, सोसायट्यांचे सांडपाणी व मैला प्रकिया न करताच थेट सोडले जात आहे. दुसरीकडे ओढे-नाल्यांची सफाई केली जात नसल्याने दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले आहेत. याचा फटका किरकटवाडीसह नांदेड, सिंहगड रोड भागातील तीस हजारांहून अधिक नागरिकांना सहन करावा लागत आहे.

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड म्हणाले, ‘ग्रामपंचायत काळापासून परिसरातील मैलापाणी, सांडपाणी प्रक्रिया न करता थेट ओढ्यात सोडले जात आहे. महापालिकेत दोन वर्षांपूर्वी हा भाग समाविष्ट झाला आहे. मुख्य खात्यामार्फत मैलापाण्यासाठी ड्रेनेजलाईन टाकण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक निधीची गरज आहे. असे असले तरी ओढे- नालेसफाईची सफाई करणे, रोगराई पसरू नये यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.’ ओढ्यातील मैलापाणी, दुर्गंधीमुळे आसपासच्या रहिवाशांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. दुर्गंधीमुळे दरवाजे बंद करावे लागत आहेत. याकडे खडकवासला मनसेचे उपाध्यक्ष रमेश करंजावणे व माजी उपसरपंच नरेंद्र हगवणे यांनी लक्ष वेधले होते.

Back to top button