पुणे : अपहरण करून खून करणार्‍याला बेड्या | पुढारी

पुणे : अपहरण करून खून करणार्‍याला बेड्या

पुणेः पुढारी वृत्तसेवा : पेरणे फाटा येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीची पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयावरून एका संघटनेच्या कार्यकर्त्याचा अपहरण करून खून करणार्‍याला लोणीकंद पोलिसांनी अटक केली. सचिन बाळू वारघडे (वय 30, रा. ढेरंगे वस्ती कोरेगाव भीमा, ता. शिरुर) असे त्याचे नाव आहे. मागील दोन वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. वारघडे याने 2020 मध्ये गोविंद कुमकर यांचा साथीदारांच्या मदतीने कट रचून खून केला होता. कुमकर हे एका संघटनेचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते. परिसरातील अवैध धंद्याची माहिती ते पोलिसांना कळवून कारवाई करण्यास विनंती करत होते.

9 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांनी पेरणे फाटा येथे दारू विक्री करणारी महिला सुनीता चमरे हिच्या अवैध धंद्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तिच्या अवैध धंद्यावर कारवाई केली होती. त्याचा राग वारघडे याच्या मनात होता. दरम्यान, 15 नोव्हेंबर रोजी कुमकर हे कामानिमित्त बाहेर निघाले होते. कुमकर यांना विधिसंघर्षित बालिकेच्या मदतीने भेटण्यास बोलावून आरोपी बाळू वारघडे, सुनीता चमरे, सत्यम चमरे, शुभम चमरे, राहुल वारघडे, सचिन वारघडे यांनी कोयता, कुर्‍हाडीने वार करून कुमकरचा खून केला. त्यानंतर चारचाकी गाडीतून त्यांचा मृतदेह पिंपरी सांडस येथील वनक्षेत्रात पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने फेकून दिला होता.

यापूर्वी सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, सचिन वारघडे हा फरार होता. त्याचा शोध घेत असताना, सायबर तपास पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक सूरज गोरे, कर्मचारी समीर पिलाने यांना सचिन हा बहुळ या गावी राहात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, गुन्हे निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सूरज गोरे, कर्मचारी बाळासाहेब सकाटे, समीर पिलाने, सचिन चव्हाण, मल्हारी सपुरे, सागर पाटील यांच्या पथकाने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Back to top button