पुणे : प्रसूतिगृहाच्या नियोजनासाठी पालिकेचा ‘ट्रान्सफर प्लॅन’ | पुढारी

पुणे : प्रसूतिगृहाच्या नियोजनासाठी पालिकेचा ‘ट्रान्सफर प्लॅन’

प्रज्ञा केळकर-सिंग : 

पुणे : कमला नेहरू रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीची सोय असली, तरी गरीब रुग्णांसाठी परवडणार्‍या दरात आयसीयू उपलब्ध होत नाही, रक्तपेढीची सुविधाही नाही. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांमध्ये अतिजोखमीच्या 200 हून अधिक गर्भवतींची ससून आणि औंध जिल्हा रुग्णालयात रवानगी करण्यात आली. अशी परिस्थिती टाळण्यासाठी महापालिकेतर्फे अंतर्गत ऑडिटच्या माध्यमातून ‘ट्रान्सफर प्लॅन’ तयार करण्यात आला आहे.

महापालिकेच्या 15 प्रसूतिगृहांपैकी केवळ 6 ठिकाणीच सिझेरियन सुविधा उपलब्ध आहे. अडचणीतून मार्ग काढण्यासाठी महापालिकेकडून अंतर्गत ऑडिट करून विश्लेषण करण्यात आले आहे. सुविधांचा अभाव, खाटांची अनुपलब्धता, ऑपरेशन थिएटर किंवा आयसीयू नसणे अशा कारणांमुळे गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी इतर रुग्णालयांमध्ये हलवावे लागते. त्यामुळे कमला नेहरू रुग्णालयावर ताण निर्माण होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

प्रमुख रुग्णालयांवर ताण
महापालिकेच्या 19 पैकी केवळ कमला नेहरू रुग्णालय, राजीव गांधी रुग्णालय, दळवी प्रसूतिगृह, सोनावणे प्रसूतिगृह, मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसूतिगृह, सुतारदरा दवाखाना या 6 ठिकाणी सिझेरियन प्रसूतीची सुविधा उपलब्ध आहे. इतर ठिकाणी ऑपरेशन थिएटरची सुविधा उपलब्ध नाही. मनुष्यबळ कमी पडत असल्याने प्रमुख रुग्णालयांवर ताण निर्माण होतो. त्यामुळे 250 परिचारिकांची 21 दवाखान्यांमध्ये नेमणूक करण्यात आली आहे.

प्रसूतिगृहांच्या अंतर्गत ऑडिटमध्ये प्रत्येक दवाखान्यामध्ये प्रसूतीसाठी नोंदणी

करणार्‍या गर्भवती, दर महिन्याला होणार्‍या प्रसूती, अतिजोखमीच्या गर्भवतींची इतर रुग्णालयांमध्ये रवानगी केल्याची कारणे आणि त्यातील कोणती कारणे टाळता येऊ शकतात, याबाबत विश्लेषण करण्यात आले आहे. कोणत्या प्रसूतिगृहाने कोणत्या परिस्थितीत गर्भवती महिलांना कोणत्या दवाखान्यात पाठवावे, याचेही नियोजन करण्यात आले आहे.
                                              – डॉ. लता त्रिंबके, वैद्यकीय अधीक्षक, प्रसूतिगृहे

काय आहे ट्रान्सफर प्लॅन?
सोनावणे प्रसूतिगृह, राजीव गांधी रुग्णालय येथे नियोजित सिझेरियन शस्त्रक्रियेच्या केस पाठवण्यात याव्यात.

सिझेरियन शस्त्रक्रिया दोन्ही ठिकाणी शक्य नसल्यास कमला नेहरू रुग्णालयात संदर्भित करण्यात याव्यात.

शॉकमधील रुग्ण, प्लेटलेटची संख्या 1 लाखांहून कमी होणे, सेंट्रल प्लासेंटाची समस्या अशा स्थितीत केस ससूनला पाठवण्यात याव्यात.

आयसीयू आणि रक्तपेढीची गरज भासणारे रुग्ण ससूनला संदर्भित करावेत.

गर्भवतींची तपासणी, उपचार, मार्गदर्शन व समुपदेशनासाठी 10-12 स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध आहेत. प्रसूतिगृहांमधील गर्भवतींवर उपचार करता यावेत, यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञांना आठवड्याचे वेळापत्रक दिले आहे, अशी माहिती प्रसूतिगृहांच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लता त्रिंबके यांनी दिली.

Back to top button