पुणे : परस्परविरोधी एक्झिट पोलमुळे उत्कंठा | पुढारी

पुणे : परस्परविरोधी एक्झिट पोलमुळे उत्कंठा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कसबा पोटनिवडणुकीचे मतदानोत्तर एक्झिट पोल मंगळवारी जाहीर झाले. पण, दोन संस्थांनी जाहीर केलेले हे पोल परस्परविरोधी असल्याने निवडणुकीत नेमके कोण जिंकणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मंगळवारी दुपारी द स्ट्रेलेमा आणि पोलिटिकल रिसर्च अ‍ॅनालिसिस ब्युरो या दोन संस्थांनी कसबा व चिंचवड येथील पोटनिवडणुकीबाबत मतदान झाल्यानंतरचे अंदाज जाहीर केले. यात कसबा व चिंचवड मतदारसंघातील राजकीय पक्षांचे बळ, जातीनिहाय लोकसंख्या, झालेले मतदान, त्याची टक्केवारी, यानुसार 2009, 2014, 2019च्या निवडणुकीत झालेले मतदान व 2023 मधील मतदानाची स्थिती याचा अंदाज घेत बूथनिहाय मतदानाचा अंदाज जाहीर केला आहे. मात्र, हे अंदाज परस्परविरोधी असल्याने आता निकालाची उत्सुकता शिगेला गेली आहे.

चंद्रकांत भुजबळ यांच्या प्राब या संस्थेने जाहीर केलेल्या अंदाजानुसार कसबा मतदारसंघातील मतदारांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या बाजूने कौल दिला आहे. त्यांना 49.69 टक्के मतदारांनी पसंती दिली आहे, तर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना 43.52 टक्के मतदारांनी पसंती दिली. तर आनंद दवे यांना 1.8 टक्के, अन्य 4.98 टक्के पसंती दिल्याचा दावा केला आहे. याच संस्थेच्या सर्व्हेनुसार चिंचवडमध्ये मतदारांनी भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना 44.13 टक्के मतदारांनी पसंती दिली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल काटे यांना 35.27 टक्के मतदारांनी पसंतीचा कौल दिला. अपक्ष उमेदवार राहुल काटे यांना 11.45 टक्के, तर अन्य 5.59 टक्के, असे पसंती कल असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

द स्ट्रेलेमा संस्थेच्या पोलनुसार कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना 74 हजार 422 मतदारांनी पसंती दिल्याचा दावा करण्यात आला आहे. तर रासने यांना 59 हजार 351 मतांचा दावा करीत त्यांना दुसर्‍या क्रमांकावर पसंती दिल्याचा अंदाज वर्तविला आहे. चिंचवड मतदारसंघात या संस्थेने केलेल्या पोलनुसार भाजपच्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांना 1 लाख 5 हजार 354 मते मिळतील, तर राष्ट्रवादीचे विठ्ठल काटे यांना 93 हजार, तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 60 हजार 173 मते मिळतील, असा अंदाज
वर्तविला आहे.

Back to top button