पुणे : ठाकरे कोणत्याही कोर्टात गेले तरी त्यांना न्याय मिळणार नाही : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले | पुढारी

पुणे : ठाकरे कोणत्याही कोर्टात गेले तरी त्यांना न्याय मिळणार नाही : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह यांचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे पक्ष आणि चिन्हासांठी कोणत्याही न्यायालयात गेले तरी त्यांना न्याय मिळणार नाही,’ असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केला.

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष
अधिकारिता मंत्रालय व राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय क्षेत्रीय कार्यशाळेचे मंगळवारी उद्घाटन झाले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. आठवले म्हणाले, ’कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे भाजपचाच उमेदवार निवडून येईल. मतदारांना पैसे वाटले आहेत. ही बाब खोटी आहे. तसेच,देशात किमान पाचशेहून वृध्दाश्रम सुरू केले जातील. त्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. वृध्दांच्या संख्येनुसार, संबंधित संस्थांना वर्षाला किमान 17 ते 18 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.’

कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे
सध्या राज्यात कांद्यास मिळणारा भाव अत्यल्प आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. परिणामी, शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला आहे. यासाठी शेतकर्‍यांच्या कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे. किमान प्रतिकिलो दहा रुपये दर मिळणे अपेक्षित आहे, असे आठवले यांनी सांगितले.

Back to top button