पुणे : एसटी कर्मचार्‍यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याची तक्रार | पुढारी

पुणे : एसटी कर्मचार्‍यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याची तक्रार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील एसटी कर्मचारी मूलभूत सुविधांपासून वंचित असून, त्यांच्या मानवी हक्कांचे तसेच संविधानिक अधिकारांचे उल्लंघन होत असल्याबाबतची तक्रार राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने दाखल करून घेतली आहे. राज्यातील 92 हजार एसटी कर्मचार्‍यांच्या वतीने अ‍ॅड. विकास शिंदे व सहकार्‍यांनी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. एसटी कर्मचार्‍यांच्या कामाची पद्धत, त्यांना दिल्या जाणार्‍या सोयी-सुविधा यांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे ही तक्रार आयोगाकडे दाखल केली होती.

विश्रामगृहांची दयनीय अवस्था, पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध नसणे, चांगल्या स्वच्छतागृहांची सोय नसणे, अनिश्चित कामाच्या वेळा या बाबी एसटी कर्मचार्‍यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर घातक परिणाम करणा-या असून, महाराष्ट्रातील सर्वच एसटी कर्मचार्‍यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करणा-या आहेत. ज्यांच्यावरील विश्वास आणि भरवशावर महाराष्ट्रासह देशातील 6 राज्यांतील लाखो प्रवासी रोजचा प्रवास करतात, त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुस्थितीत असणे गरजेचे असताना महामंडळाकडून आजपर्यंत याबाबत कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.

महाराष्ट्रातील एसटी कर्मचार्‍यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन थांबणे गरजेचे असल्याचे तक्रारीत म्हटले आले. प्रथमदर्शी तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे तसेच अपु-या सुविधांअभावी महाराष्ट्रातील एसटी कर्मचार्‍यांचे मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे गृहीत धरून राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने तक्रार दाखल करून घेतली आहे.

Back to top button