पुणे: पोलिसांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, सहा घरफोड्यांत सहा लाख 81 हजारांचा ऐवज चोरीला | पुढारी

पुणे: पोलिसांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, सहा घरफोड्यांत सहा लाख 81 हजारांचा ऐवज चोरीला

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहरातील विविध भागांत घरे फोडून चोरट्यांनी सहा लाख 81 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. विश्रांतवाडी पोलिस वसाहतीतील दोघा पोलिसांच्या घरी देखील चोरट्यांनी डल्ला मारून रोकड व सोन्याचे दागिने चोरी केले आहेत.

खराडी- थिटेनगर झेन्सॉर आयटी पार्क येथील प्रकाश कॉम्प्लेक्समध्ये चोरट्यांनी घरफोडी करून 2 लाख 9 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. या प्रकरणी दर्शना जागडे (वय 42) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली आहे. फिर्यादी पत्नी व त्यांच्या मुलांसोबत चर्चला गेल्या होते. त्या वेळी चोरट्यांनी सदनिकेचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर सोन्याचे दागिने व रोकड असा 2 लाख 9 हजारांचा ऐवज चोरी करून पोबारा केला.

याच दिवशी साडेसहा वाजेच्या सुमारास तुकारामनगर खराडी येथील अ‍ॅरोमा रेसिडेन्सीमध्ये घरफोडी करून चोरट्यांनी 1 लाख 73 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी, उज्वल रामदास शेळके (वय 32) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या पत्नीसह भाजी खरेदीसाठी बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा ऐवज चोरी करून पळ काढला.

सेंटर स्ट्रीट येथील एका एम्रायडरीच्या दुकानात चोरी केल्याप्रकरणी लष्कर पोलिसांनी अब्दुल बारी कुरेशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मोहन खत्री (वय 70, रा. वानवडी विकासनगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादींच्या दुकानाशेजारी असलेल्या दुकानाचा भाडेकरू कुरेशी याने त्यांच्या दुकानाचे लॉक तोडून दुकानातील एम्राडरीचे दोन मशीन, एक शिलाई मशीन, वॉल फॅन, टेबल फॅन व रोकड, ग्राहकांचा कपडा असा मुद्देमाल चोरी केला.

स्नेहविहार सोसायटी टेलिफोन एक्सचेंजशेजारी डी. पी. रोड औंध येथील एका सदनिकेत चोरट्यानी चोरी केली. तेथून सोन्याचे दागिने, विदेशी चलन, चारचाकी गाडीची चावी, चांदीची भांडी असा 83 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी, महेश मालुसरे (वय 52) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 25 ते 26 फेब्रुवारी रोजी घडली आहे.

पोलिसांचीच घरे असुरक्षित

विश्रांतवाडी पोलिस वसाहतीतील दोन सदनिकेतून चोरट्यांनी 1 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. ही घटना 26 ते 27 फेब्रुवारी रोजी घडली आहे. या प्रकरणी, पोलिस कर्मचारी अल्लाउद्दीन मुसा सय्यद (वय 27, रा. विश्रांतवाडी पोलिस वसाहत) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे विश्रांंतवाडी पोलिस वसाहतीत बिल्डिंग क्रमांक एकमधील खोली क्रमांक दोनमध्ये राहतात. तर त्यांच्या शेजारी खोली क्रमांक तीनमध्ये पवन पवार राहतात. सय्यद हे कर्तव्यावर गेले होते, तर पवन हे नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते. त्यामुळे दोघाच्या सदनिका बंद असताना चोरट्यांनी लॉक तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर सय्यद यांच्या घरातून 33 हजार रुपये तर पवन यांच्या घरातून 93 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी केला.

Back to top button