पुणे: मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश | पुढारी

पुणे: मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कसबा पोटनिवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर त्याची मतमोजणी गुरुवारी (दि. 2) कोरेगाव पार्क भागातील अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत.

मतमोजणी केंद्र परिसरात शस्त्र परवाना असलेल्या व्यक्तींना शस्त्र बाळगण्यास मनाई आहे. मतमोजणी केंद्र परिसरात मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्र परिसरात पक्षाच्या कार्यकर्त्यांना ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास मनाई करण्यात आल्याचे सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले. तसेच या परिसरात कोणताही मजकूर लिहिण्यास किंवा छापील मजकूर चिकटविण्यास मनाई करण्यात आली आहे. शासकीय वाहने सोडून अन्य वाहनांना या परिसरात प्रवेश देण्यात येणार नाही. मतमोजणी केंद्रात अधिकृत परवानगी पत्र (पास) असलेल्या व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार आहे.

विजयी मिरवणूक काढण्यास मनाई

मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विजयी उमेदवारांना विजयी मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

Back to top button