पारगाव : मेंढपाळांनी घेतला नदीकाठचा आसरा | पुढारी

पारगाव : मेंढपाळांनी घेतला नदीकाठचा आसरा

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मेंढपाळांनी चाराटंचाईमुळे नदीकाठचा आसरा घेतला आहे. येथील घोड, मीना नद्यांच्या किनारी हे मेंढपाळ शेळ्या-मेंढ्यांसह इतर जनावरांना चारताना दिसत आहेत. यंदा चाराटंचाईचे संकट दोन महिने अगोदरच निर्माण झाले आहे. त्यातच कडाक्याचे ऊन पडत असल्याने मेंढपाळ त्रस्त झाले आहेत. सध्या कोठेही चारा शिल्लक नसल्याने चाराटंचाईचे संकट तीव्र झाले आहे. स्थानिक तसेच धनगर मेंढपाळांची संख्या या परिसरात सर्वाधिक आहे. डोंगर-माळरानावरील गवत देखील जळून गेल्याने कोठेही चारा शिल्लक नाही. परिणामी, मेंढपाळांना शेळ्या-मेंढ्यांना घेऊन दूरवर चार्‍यासाठी भटकंती करावी लागत आहे.

घोड नदीपात्रातील पाणी झपाट्याने कमी होत चालल्याने नदीकिनारी असलेल्या पारगाव, जवळे, भराडी या गावात मेंढपाळांनी नदीकाठचा आसरा घेतला आहे. दिवसभर मेंढपाळ नदीकिनारीच शेळ्या-मेंढ्यांना चारताना दिसत आहेत. गतवर्षीच्या अतिपावसाचा फटका डोंगर माळरानावरील गवताला बसला. गवत सडून गेल्यामुळे चार्‍याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या परिसरात धनगर मेंढपाळ चार्‍याच्या शोधात मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. त्यांच्याकडे शेकडो शेळ्या-मेंढ्या आहेत. कोठेही चारा शिल्लक नसल्याने यंदाचा उन्हाळा अतिशय कठीण असल्याचे मेंढपाळ अनिल शेवाळे यांनी सांगितले.

Back to top button