खडकवासलातून शेतीला उन्हाळी आवर्तन | पुढारी

खडकवासलातून शेतीला उन्हाळी आवर्तन

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेची लाट सुरू असलेल्यांने लाभक्षेत्रातील पिके वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून तीन दिवस आधीच सोमवारी (दि. 27) शेतीला उन्हाळी आवर्तनाचे पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. त्याचा लाभ जिल्ह्यातील 66 हजार हेक्टर क्षेत्रातील पीकांना होणार आहे. शेतीला 1 मार्च पासून उन्हाळी आवर्तनाचे पाणी सोडण्यास सुरुवात होणार होती. मात्र, हवेली, दौंड इंदापूरसह जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी पीकांच्या नुकसानीकडे जलसंपदा विभागाचे लक्ष वेधले. त्यामुळे सोमवार (दि. 27) पासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली.

पानशेत, वरसगाव,टेमघर व खडकवासला या चार धरणांच्या धरणासाखळीत सोमवारी सायंकाळी पाच वाजता 18.89 टीएमसी म्हणजे 64.45 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षीच्या तुलनेत धरण साखळीत 1 टीएमसी जादा पाणी साठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 27 फेब—ुवारी 2022 रोजी धरण साखळीत 17.87 टीएमसी म्हणजे 61.29 टक्के पाणी साठा होता.

शेतीचे रब्बी आवर्तनाचे पाणी 6 फेब—ुवारी रोजी बंद करण्यात आले. मात्र फेब—ुवारी च्या दुसर्‍या आठवड्या पासून कडक उन्हाळा सुरू झाला. इंदापूर दौंड हवेलीसह लाभ क्षेत्रातील पीकांना पाण्याची पाण्याची मागणी वाढली आहे. खडकवासलाच्या पाण्यावर हवेली, दौंड आदी भागांतील पिण्याच्या पाणी योजना अवलंबून आहेत. त्यामुळे शेतीसह पिण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे यासाठी जलसंपदा विभागाने नियोजन केले आहे.

धरण साखळीतील टेमघर वगळता इतर तीन धरणात पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक पाणी आहे. टेमघर मध्ये केवळ 12.29 टक्के साठा आहे. पानशेत (नरवीर तानाजी सागर) धरणात 66.14 टक्के, वरसगाव (वीर बाजी पासलकर जलाशय) धरणात 80.25 टक्के, व खडकवासलात 50 टक्के पाणी साठा आहे. शेतीला पाणी पुरवठा सुरू करण्यात आल्याने पानशेत मधुन 600 क्युसेकने पाणी खडकवासलात सोडले जात आहे.

अचानक पाणीपुरवठ्यात कपात
सोमवारी सकाळी आठ वाजता शेतीसाठी खडकवासलातुन मुठा कालव्यात 100 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने तीन वेळा विसर्गात वाढ करण्यात आली. दुपारी दोन वाजता 702 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. त्यात पुन्हा वाढ करून सायंकाळी पाच वाजता 1005 क्युसेकने पाणी सोडण्यात येणार होते.

मात्र, दुपारी चार वाजता अचानक विसर्गात अचानक कपात करुन विसर्ग 300 क्युसेक करण्यात आला. रब्बी आवर्तनात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुठा कालव्यातुन गळतीचे प्रकार घडले होते. तसा प्रकार घडल्यामुळे पाणी कपात करण्यात आली का याबाबत खडकवासलाचे कार्यकारी अभियंता पाटील तसेच उपविभागीय अभियंता मोहन बदाणे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी असा प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत 300 क्युसेक विसर्ग सुरू होता.

1 मार्चपासून उन्हाळी आवर्तनाचे पाणी सोडण्यात येणार होते. मात्र, कडकडीत उन्हाळ्यामुळे पिके वाया जाण्याची शक्यता असल्याने शेतकर्‍यांच्या मागणीनुसार तीन दिवस आधीच पाणी सोडले सुरू केले आहे. मुठा कालव्याच्या शेवटच्या टोका पर्यंतच्या लाभ क्षेत्रातील शेतीला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

            विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग

Back to top button