

बारामती; पुढारी वृत्तसेवा : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना 2022-23 अंतर्गत सलग क्षेत्रावर फळबाग व बांधावर फळझाडे लागवडीसाठी इच्छुक शेतकर्यांनी सबंधित गावातील कृषी सहायकाकडे अर्ज करावेत, असे आवाहन उप विभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे. बारामती उपविभागास फळबाग लागवड योजनेसाठी 901 हेक्टर फळपिके लागवडीचे लक्षांक दिले होते
. प्रत्यक्ष 938 हेक्टर क्षेत्रावर फळपिकाची लागवड झाली असून, 100 टक्के लक्षांक पूर्ण झाले आहे. जानेवारी 2023 अखेर 1 हजार 515 हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अकुशल कामगारांना 256 रुपये प्रतिदिनप्रमाणे मजुरी दर आहे. क्षेत्र परिस्थितीनुसार लागवडीचे अंतर कमी-जास्त करण्यास परवानगी आहे. देय अनुदान व फळपीक लागवडीचे निकष विद्यापीठ शिफारशीनुसारच मर्यादित असून, कलम-रोपे यांचे अनुदान या योजनेत मिळणार नाही.
अशी आहे योजना
फळबाग लागवड योजनेंतर्गत आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, का.लिंबू, संत्रा, मोसंबी, सीताफळ, नारळ, आवळा, अंजीर, जांभूळ, चिंच, फणस, शेवगा, काजू, ड्रॅगनफ्रुट, अॅव्हाकॅडो, केळी व द्राक्ष या पिकांचा समावेश आहे. गुलाब, मोगरा व निशीगंध या फुलपिकांच्या लागवडीसाठीदेखील परवानगी देण्यात आलेली आहे.
देय अनुदान
लागवड वर्षासह सलग 3 वर्षांत मंजूर अंदाजपत्रकानुसार अनुदान देय आहे. दुसर्या व तिसर्या वर्षी बागायती फळपिकांकरिता किमान 90 टक्के फळझाडे व कोरडवाहू फळपिकांकरिता किमान 75 टक्के फळझाडे जिवंत ठेवतील अशाच लाभार्थ्यांना दुसर्या व तिसर्या वर्षाचे अनुदान देय राहील. वैयक्तिक बांधावरील फळपिके लागवडीसाठी हेक्टरी 20 रोपे या मर्यादेत फळपिकांची लागवड ही योजना राबविण्यात येत असून, यासाठीदेखील अनुदान देय आहे.
लाभार्थी निकष
कमीत कमी 0.05 हेक्टर व जास्तीत जास्त 2 हेक्टर प्रती लाभार्थी क्षेत्राची मर्यादा आहे. इच्छुक लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. सातबारास कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती लागेल. अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जाती, दारिर्द्यरेषेखालील व्यक्ती, अल्प व अत्यल्प भूधारक, महिला व दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थी ग्रामपंचायतीचा जॉबकार्डधारक असावा.