दूषित पाणीपुरवठ्याने मोशीकर हैराण; आरोग्याच्या वाढल्या समस्या | पुढारी

दूषित पाणीपुरवठ्याने मोशीकर हैराण; आरोग्याच्या वाढल्या समस्या

मोशी; पुढारी वृत्तसेवा : पिवळसर दूषित पाणीपुरवठ्यामुळे मोशीकर हैराण झाले असून, हे पाणी पिल्याने विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे या समस्येकडे दुर्लक्ष होत असून, गेल्या आठ दिवसांपासून दूषित पाणी पिण्याची वेळ मोशीकरांवर आली आहे.

अधिकार्‍यांचे दुर्लक्ष
मोशीतील बोराटेवस्ती, देहू रस्ता परिसर, मोशी गावठाण व इतर परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. वारंवार तक्रार करूनदेखील यात बदल होत नसल्याचे दिसत आहे. शहराला आंध्रा धरणातून पाणी आणण्याचे एकीकडे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे आहे तोच पाणी पुरवठादेखील सुस्थितीत राखला जात नसल्याचे दिसत आहे. याकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले
याविषयी स्थानिक नागरिक संतोष बोराटे यांनी सांगितले, की गेल्या आठ दिवसांपासून पिवळसर दूषित पाणी येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे पोटाचे आजार होऊ लागले आहेत. याबाबत पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली आहे. मात्र, पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा होताना दिसून येत नाही. यामुळे मागील काही दिवसांपासून मोशी परिसरातील नागरिक आरोग्याच्या तक्रारीमुळे हैराण झाले आहेत. दूषित पाणी व वातावरणातील बदलांमुळे सर्दी, खोकला, कफ, थंडी, ताप असे आजार झाल्याने येथील दवाखाने, हॉस्पिटल गर्दीने फुल्ल झाल्याचे दिसून येत आहे.

 

 

 

 

Back to top button