लोणावळ्यात मोटारसायकलच्या अपघातात दोघांचा मृत्यू | पुढारी

लोणावळ्यात मोटारसायकलच्या अपघातात दोघांचा मृत्यू

लोणावळा : जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यातील रिदम हॉटेलसमोर एका अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री सव्वाबाराच्या दरम्यान झाली. अपघातातील दोन्ही मयत हे वीटभट्टी कामगार असून, दोघे सख्खे साडू होते.

दीपक परशुराम पवार (वय 40), लक्ष्मण तातुराम वाघमारे (वय 30, दोघेही रा. सावरोली, खोपोली, रायगड) असे अपघातात मृत्यू झालेल्या वीटभट्टी कामगारांची नावे आहेत. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक आणि लक्ष्मण देवघर येथील एका वीटभट्टीवर काम करत होते. रविवारी कामानिमित्त दोघे मोटारसायकलवरून (क्रमांक एमएच-06/एएम-6395) गावाला निघाले होते.

रविवारी रात्री ते पुन्हा गावाहून देवघरला परत येताना जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यातील रिदम हॉटेलसमोर त्यांच्या मोटारसायकलला एका अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. यात गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी नितेंद्र कदम व शिवा धनगर यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करत रुग्णवाहिकेतून दोघांना नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिस कर्मचारी नितेंद्र कदम यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा तपास लोणावळा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी शकील शेख हे करीत आहेत.

Back to top button