पिंपरी : शेवाळपासून बायोडिझेलची निर्मिती; डिझेलच्या तुटवड्यावर विद्यार्थ्यांनी शोधला उपाय | पुढारी

पिंपरी : शेवाळपासून बायोडिझेलची निर्मिती; डिझेलच्या तुटवड्यावर विद्यार्थ्यांनी शोधला उपाय

वर्षा कांबळे

पिंपरी : सध्या सर्वत्र डिझेलची कमतरता भासत आहे. त्यामुळे डिझेलवर चालणार्‍या वाहनांना समस्या निर्माण होत आहे. तसेच इतर देशामधून आयात होत असल्याने दिवसेंदिवस डिझेलच्या दरात वाढ होत आहे. हेच डिझेल देशात तयार झाले, तर आपल्याला डिझेलचा तुटवडा भासणार नाही. यासाठी चिंचवड येथील श्रीमती गेंदीबाई चोपडा ज्यु. कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी शेवाळपासून बायोडिझेलची निर्मितीचा यशस्वी प्रयोग केला आहे.

अकरावी विज्ञान शाखेत शिकतर्‍या धन्वंतरी गायकवाड, प्रसन्न दिवेकर, ओम वाघेला आणि विज्ञान शिक्षिका प्रतीक्षा पाटील यांनी सादर केलेल्या या प्रयोगाला तालुकास्तरावर तिसरा क्रमांक मिळाला आहे. त्यांना संशोधन करताना असे दिसले की, शेवाळ या वनस्पतीमध्ये 80 टक्के तेल असते. जे पाण्याला दूषित करते. त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. याचा परिणाम पाण्यातील जलजीवनावर होत असतो. या शेवाळाचा उपयोग जर बायोडिझेल निर्मितीसाठी झाला, तर यामध्ये दुहेरी फायदा आहे. एक म्हणजे आपल्याला कमी पैशात डिझेल मिळेल आणि दुसरा म्हणजे पाणीसाठे शुद्ध राहतील. याउद्देशाने हा प्रकल्प मांडण्यात आला आहे.

बायोडिझेलची निर्मिती कशी केली जाते?
शेवाळला इंग्रजीमध्ये अल्गी म्हटले जाते. यामध्ये दोन प्रकार आहेत. मायक्रो अल्गी व मॅक्रो अल्गी. यामधील मायक्रो अल्गीमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. शेवाळाला प्रथम ग्राईंड केले जाते. यामध्ये ग्राईंड करताना मिथेनॉल, कॉस्टिक सोडा व एनेहेक्जेन मिक्स केले जाते. यांनतर 24 तासांसाठी हे मिश्रण सीलबंद केले जाते. या प्रक्रियेनंतर मिश्रणातील ऑईल वरती येते. यालाच कच्चे तेल (क्रूड ऑईल) म्हणतात. सर्वात शेवटी हे ऑईल गरम पाण्यात मिक्स करून याचे शुद्धिकरण केले जाते. यानंतर पुन्हा याला रेस्ट केल्यानंतर पाण्यावर ऑईल जमा होते. आप्रकारे आपल्याला शुद्ध केलेले बायोडिझेल मिळते. 250 ग्रॅम शेवाळापासून 49 एमएल बायोडिझेल मिळते.

फायदे
पाण्यातील शेवाळाचा वापर केला तर पाणी शुद्ध होते.
शेवाळाचे प्रमाण कमी झाल्याने जलचरांना अधिक ऑक्सिजन मिळतो.
डिझेलचे साठे संपत आहेत. त्यामुळे भविष्यात याचे उत्पादन फायदेशीर
बायोडिझेलसाठी मोठ्या प्रमाणात शेवाळच्या शेतीचा प्रयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक साह्य मिळेल.
बायोडिझेल प्रक्रियेत शेवाळातून तेल काढल्यानंतर राहिलेल्या चोथ्यापासून खत निर्मिती करता येते.

Back to top button