पिंपरी : प्रभागात मते वाढली की घटली ? आकडेवारीवरून माजी नगरसेवकांचे ‘वजन’ ठरणार | पुढारी

पिंपरी : प्रभागात मते वाढली की घटली ? आकडेवारीवरून माजी नगरसेवकांचे ‘वजन’ ठरणार

मिलिंद कांबळे

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 13 प्रभागानुसार अभ्यास केला जात आहे. प्रभागातील माजी नगरसेवकांच्या वजनानुसार मतांची घट व वाढ होणार आहे. त्यावरून उमेदवाराचा विजय ठरणार आहे. त्या दृष्टीने प्रत्येक उमेदवारांकडून ठोकताळे बांधण्यात येत आहेत. चिंचवड मतदारसंघात महापालिकेचे एकूण 13 प्रभाग येतात. एका प्रभागात 4 नगरसेवक असे एकूण 53 नगरसेवक आहेत.

त्यात भाजपचे 34, राष्ट्रवादी काँग्रेसचे 9, शिवसेनेचे 6 आणि अपक्ष 4 नगरसेवक आहेत. भाजपच्या माजी नगरसेविका चंदा लोखंडे, माया बारणे, माजी नगरसेवक तुषार कामठे, भाजप संलग्न अपक्ष कैलास बारणे यांनी भाजपला रामराम केला आहे. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या संख्येत बदल झाला आहे. तसेच, अपक्ष नगरसेवक भाजप, राष्ट्रवादी व अपक्ष उमेदवारासोबत आहेत.

विशेषत: भाजप व राष्ट्रवादीच्या नगरसेवक सर्वच माजी नगरसेवकांना मतांचे टार्गेट दिले होते. जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी नागरिकांना घराबाहेर काढण्याचा सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. प्रचार काळात संपूर्णपणे आपल्या प्रभागातच लक्ष देण्याचे बजावण्यात आले होते. त्यांच्या मदतीसाठी भोसरी व पिंपरी विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक व पदाधिकारी सोबतीला देण्यात आले होते. घरोघरी पोहचण्यासाठी माजी नगरसेवकांनी कसोशीने प्रयत्न केल्याचे दावे केले जात आहेत.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने प्रचारासह चिन्ह घरोघरी पोहचविण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले. रविवारी (दि.26) झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून मतदान केंद्रनिहाय मतदानांचा गोषवारा काढून आपलाच उमेदवार जिंकणार, असा दावा भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे व अपक्ष राहुल कलाटे हे प्रमुख तीन उमेदवार करीत आहेत.

भाजपचे लक्ष पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी, चिंचवड गावातील लीडवर
पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी हा दिवंगत आ. लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला आहे. या भागात अनुक्रमे 53, 51 व 49 टक्के आणि एकूण 62 हजार 925 इतके मतदान झाले आहे. तसेच, भाजपचा पारंपरिक मतदार असलेल्या चिंचवडगाव व परिसरात 50 टक्के मतदान झाले आहे. ती संख्या 51 हजार 764 इतकी आहे. तसेच, भाजपचे माजी नगरसेवक असलेल्या प्रभागातही चांगले मतदान झाले आहे. तेथे सर्वाधिक मते भाजपच्या पारड्यात जाऊ शकतात.

पिंपळे सौदागर, रहाटणीच्या वाढीव मतांवर महाविकास आघाडीची भिस्त
पिंपळे सौदागर व रहाटणी हा महाविकास आघाडीचे नाना काटे व त्यांच्या पत्नी शीतल काटे यांचा प्रभाग आहे. तेथे 18 हजार 65 मतदान झाले असून, ते प्रमाण 45 टक्के आहे. तसेच, रावेत, किवळे, मामुर्डी प्रभागात 26 हजार 37 (48 टक्के) आणि थेरगावात 16 हजार 950 (53 टक्के) मतदान झाले आहे. तसेच, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक असलेल्या प्रभागातही मतदान 45 ते 50 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्या प्रभागात मतदार महाविकास आघाडीला मोठी पसंती देतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे ‘पुन्हा राष्ट्रवादी’चा गजर घुमू शकतो.

वाकड, थेरगाव, आयटीयन्सच्या मतांवर शिट्टीचा आवाज
अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे वाकड प्रभागाचे माजी नगरसेवक आहेत. त्या भागांत 20 हजार 465 मतदान झाले आहे. तसेच, आयटीयन्स राहत असलेल्या थेरगाव, पिंपळे निलख या भागांतून चांगले मतदान झाले आहेत. त्यामुळे कलाटे यांच्या शिट्टीचा आवाज वाढू शकतो.

…तर महापालिका निवडणुकीचे तिकीट कट होणार ?
निवडणुकीपूर्वी सर्व माजी नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात मतदान वाढविण्यासाठी टार्गेट देण्यात आले होते. ज्या भागात जास्त मतदान झाले, तेथील माजी नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, मागील निवडणुकीपेक्षा कमी मतदान झाले असल्यास त्या माजी नगरसेवकाचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक धास्तावले आहेत.

उमेदवारांच्या टीमकडून स्क्षम विश्लेषण
उमेदवारांच्या टीमकडून झालेल्या मतदानांचे विश्लेषण केले जात आहे. त्याकरीता स्थानिक अनुभवी मंडळी व्यस्त आहेत. कोणत्या प्रभागात किती मतदान झाले त्यासाठी कोणी मेहनत घेतली. या वरून अंदाज बांधण्यात येत आहेत. कोणता भाग कोणाकडे झुकला. आमिष दाखवून व पैश्यांचे वाटप कोणत्या भागात झाले. कोणत्या भागांतील मते कोणाकडे जातील, याचा अभ्यास करून एकूण मते निर्धारित करण्यात येत आहेत. त्याद्वारे प्रमुख उमेदवारांकडून विजयांचे दावे केले जात आहेत.

Back to top button