भोरच्या शनी, जानाई घाटाची स्वच्छता | पुढारी

भोरच्या शनी, जानाई घाटाची स्वच्छता

भोर; पुढारी वृत्तसेवा : संत निरंकारी मंडळाच्या वतीने अमृत प्रकल्प : स्वच्छ जल स्वच्छ मन या उपक्रमांतर्गत शहरातील निरा नदीवरील शनी मंदिर घाट व जानाई मंदिराच्या घाटाची स्वच्छता व साफसफाई करण्यात आली. संत निरंकारी मंडळाच्या भोर, कारी व नाझरे येथील 150 जलदूतांसमवेत नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील 10 कर्मचार्‍यांनी रविवारी सकाळी ही मोहीम राबविली.

अमृत प्रकल्पामुळे शनी घाट व जानाई घाटावरील झाडेझुडपे, घाण, दलदल आणि दुर्गंधी हटविण्यात आली. रविवारी (दि. 26) सकाळी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख महेंद्र बांदल व पाणीपुरवठा अधिकारी किशोरी फणसेकर, संत निरंकारी मंडळाचे अजित चिकणे, ज्ञानोबा खोपडे व घनश्याम देवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनी घाटाच्या स्वच्छतेस सुरुवात करण्यात आली. याकामी संत निरंकारी मंडळाचे शहाजी शिंदे, ज्ञानोबा देवघरे, दत्तात्रेय चव्हाण, निर्मला सोनवणे, आशा पवार, अलका बांदल व लक्ष्मण मांढरे आदी प्रमुख मान्यवरांनी विशेष प्रयत्न केले.

नगरपालिकेचे पदाधिकारी उदासीन
संत निरंकारी मंडळाच्या वतीने नगरपालिका प्रशासनास घाटांची स्वच्छता करणार असल्याचे निवेदन आठ दिवसांपूर्वीच दिले होते. परंतु, महेंद्र बांदल आणि किशोरी फणसेकर हे दोन अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या 10 कर्मचार्‍यांशिवाय नगरपालिकेचा एकही पदाधिकारी या अभियानाकडे फिरकला नाही. यामुळे नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि सर्व पदाधिकार्‍यांची स्वच्छतेबाबत उदासीनता दिसून आली.

Back to top button