

पारगाव(आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात पिवळ्या धमक झेंडूचे मळे बहरले आहेत. सध्या सुरू झालेला गावोगावचा यात्रा हंगाम, आगामी लग्नसराईत झेंडूला बाजारभावाची निश्चित साथ मिळेल, असा शेतकर्यांना विश्वास आहे. तालुक्याच्या पूर्वभागात फूल उत्पादक शेतकरी सर्वाधिक आहेत. दरवर्षी झेंडूच्या फुलांची लागवड मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात. सणासुदीचे दिवस, लग्नसराई, यात्रा हंगाम हे डोळ्यांसमोर ठेवूनच शेतकरी झेंडूचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. परंतु, गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये झेंडूच्या फुलांना अपेक्षित बाजारभाव मिळालाच नाही. झेंडूसाठी शेतकर्यांनी गुंतवलेले भांडवल वसूल झालेच नाही.
यंदा बाजारभावाची साथ निश्चित मिळेल, अशा आशेने पारगाव, शिंगवे, रांजणी, वळती, नागापूर, थोरांदळे, जाधववाडी आदी परिसरातील शेतकर्यांनी झेंडूची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. उत्पादन अधिक मिळवण्यासाठी बहुतांशी शेतकर्यांनी शेतात मल्चिंग पेपरचा वापर करून झेंडूच्या संकरित रोपांची निवड केली आहे. गावोगावी ग्रामदैवतांच्या यात्रा हंगामाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे झेंडूच्या फुलांना मोठी मागणी वाढली आहे. तसेच पुढील महिन्यापासून लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. यामध्येदेखील झेंडूच्या फुलांना चांगला बाजारभाव मिळेल, अशी आशा शेतकर्यांना आहे.