

पुणे; पुढारी वृत्तसेवा : टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेली महिला पुण्यात मसाज सेंटरमध्ये नोकरी करीत असल्याचे आढळले. याप्रकरणी पुणे पोलिस आयुक्तालयातील परकीय नागरिक नोंदणी विशेष शाखेने महिलेवर हद्दपारीची कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये पर्यटन परवाना (टुरिस्ट व्हिसा) घेऊन भारतात ही महिला आली होती. विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी मसाज पार्लवर नोकरी करीत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती.
त्यानुसार परकीय नागरिक नोंदणी विशेष शाखेच्या अधिकार्यांनी संबंधित महिलेची चौकशी केली. त्यात ती नोकरी करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन मुंढवा येथील शासकीय महिला सुधारगृहात ठेवले. त्यानंतर त्या महिलेला तिच्या मायदेशी पाठविण्यासाठी तिकीट आरक्षित करण्यात आले. 26 फेब्रुवारीला महिलेला काळ्या यादीत टाकण्यात आले असून, तिला पुन्हा भारतात प्रवेश मिळणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.