पुणे : बाशिममध्ये लहानग्यांनी अनुभवली ग्रामीण संस्कृती | पुढारी

पुणे : बाशिममध्ये लहानग्यांनी अनुभवली ग्रामीण संस्कृती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : चावडीवर दोघा भावांचा तंटा सोडवणारे पंच, गावाला जागे करणारे वासुदेव, विहीर व हातपंपावर पाणी भरणार्‍या बाया, कावडीतून पाणी वाहून नेणारे पुरुष, टुमदार घरे, हिरवीगार शेती, गावाचा बाजार, जत्रा अन् बैलगाडी अवतरली थेट भांडारकर रस्त्यावरील डेक्कन जिमखान्याच्या ‘बाशिम’ गावात! मराठी भाषा गौरव दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भांडारकर रस्त्यावरील मएसो बालशिक्षण मंदिर शाळेच्या शताब्दीपूर्ती वर्षानिमित्त खास दोन दिवसांच्या ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडवणारे ’बाशिम’ गाव साकारण्यात आले आहे. मंगळवारी (दि.28) सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे प्रदर्शन पाहता येणार आहे.

शिशुनिकेतन व चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन, ग्रामीण संस्कृतीची ओळख व्हावी, हा यामागील उद्देश आहे. या बाशिम गावात ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, दवाखाना, पाटलांचा वाडा, कौलारू घरे, मंदिरे, चावडी, शेती व त्यासाठी अवजारे, बाजारहाट, जत्रा, बैलगाडी, गोठा आदी साकारण्यात आले आहे. गावातील भजन-कीर्तन, पालखी सोहळा, लोककला व संस्कृतीचे सादरीकरण लक्षवेधी आहे. बैलगाडीची मनसोक्त रपेट मारून झाल्यावर लहानग्यांच्या चेहर्‍यावर आनंदाचे हास्य फुलले. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता चव्हाण यांची ही संकल्पना आहे.

Back to top button