पुणे: ऐन उन्हाळ्यात पाणीगळती, बिबवेवाडी परिसरातील स्थिती; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष | पुढारी

पुणे: ऐन उन्हाळ्यात पाणीगळती, बिबवेवाडी परिसरातील स्थिती; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

बिबवेवाडी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: बिबवेवाडी परिसरात अनेक ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. या कामांसाठी रस्ता खोदाई करताना जलवाहिन्या फुटून पाणी गळती हाेत असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येते. महापालिका प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

अप्पर, सुपर, विश्वकर्मा महाविद्यालय परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीतून गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाणी गळती होत आहे. नागरिकांनी याबाबत पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली आहे. परंतु, या जलवाहिनीची अद्यापही दुरुस्ती न केल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. काकडेवस्ती चौक, शिवतेजनगर, शेळकेवस्ती इत्यादी ठिकाणी पाणी गळतीमुळे रस्त्यावरून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे. या समस्याकडे पाणीपुरवठा विभागाने त्वरित लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

राजा शिवछत्रपती रुग्णालयाच्या परिसरात जलवाहिनीतून गळती झाल्याने मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वाया गेले. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने कामे केल्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याचा अपव्यय होत आहे.

– गणेश मोहिते, सामाजिक कार्यकर्ते, बिबवेवाडी.

अप्पर परिसरात जलवाहिनीतून पाणी गळती होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने कर्मचारी पाठवून दुरुस्त करून घेतली आहे. मात्र, काही ठिकाणी जर अजूनही पाणी गळती होत असेल, तर त्वरित दुरुस्त केली जाईल.

-शांतीलाल कोळेकर, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

Back to top button