पुणे: कपाटातील साहित्य उचकटले, हाती काहीच लागले नाही; शेवटी टेबलावरील चावी चोरून पार्किंगमधील कार पळवली | पुढारी

पुणे: कपाटातील साहित्य उचकटले, हाती काहीच लागले नाही; शेवटी टेबलावरील चावी चोरून पार्किंगमधील कार पळवली

पुणे, पुढारी वृत्तसेवा: बंद सदनिकेचा कडी-कोयंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. त्यानंतर टेबलावरील कारची चावी चोरी करून पार्किंगमध्ये उभी केलेली चारचाकी गाडी घेऊन पळ काढला. ही घटना निर्मल हाऊसिंग सोसायटी, कोटबागे हॉस्पिटल डी.पी.रोड औंध येथे 25 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास एका डॉक्टरच्या घरी घडली आहे. या प्रकरणी राहुल बेंदुगडे (वय.27) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चतुःश्रृंगी पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

चोरी झालेले सदनिकेचे मालक डॉ. आर राजराव हे फिर्यादींचे मानलेले वडील आहेत. त्यांची सदनिका बंद असताना चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील साहित्य उचकटले. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. दरम्यान टेबलावर ठेवलेल्या गाडीच्या चाव्या चोरट्यांना दिसल्या. त्यानंतर त्यांनी दोन चाव्या घेऊन पार्किंगमध्ये उभी केलेली दोन लाख रुपये किंमतीची कार व एका कारची दोन हजार रुपये किंमतीची चावी चोरी करून पळ काढला. घरफोडी झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button