पुणे : उन्हामुळे रसदार फळांना मागणी | पुढारी

पुणे : उन्हामुळे रसदार फळांना मागणी

पुणे : उन्हाचा पारा चढू लागल्याने बाजारात लिंबू, कलिंगड, खरबूज, मोसंबी, संत्री आदी फळांना मागणी वाढली आहे. बाजारात सर्व फळांची आवक साधारण आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने कलिंगड, खरबूजाचे भाव किलोमागे एक ते चार रुपये, लिंबू गोणीमागे शंभर ते दीडशे रुपये तर मोसंबी व संत्रीचे भाव पाच ते दहा टक्क्यांनी वधारले आहेत.

द्राक्षाचा हंगाम बहरला असून बाजारात द्राक्षांची आवक वाढत आहे. द्राक्षाला गोडी आली असून मागणीही होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने द्राक्षाचे भाव दहा टक्क्यांनी उतरले आहेत. मागणी अभावी पपईच्या भावातही किलोमागे दोन ते चार रुपयांनी घसरण झाली आहे. सोलापूरच्या बोरांचा हंगाम संपल्याने बाजारात बोरांची आवक ठप्प झाली आहे. सध्या राजस्थान येथून चण्यामण्या बोरे आठवड्यातून दोनदा पाच ते दहा डाग या स्वरुपात दाखल होत आहेत. बोरांसह उर्वरित सर्व फळांची आवक-जावक कायम असून दर टिकून आहेत.

रविवारी (दि. 26) मार्केट यार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस 6 ट्रक, संत्री 50 ते 60 टन, मोसंबी 30 ते 35 टन, डाळिंब 20 ते 25 टन, पपई 10 ते 15 टेम्पो, लिंबे सुमारे एक हजार ते एक हजार 400 गोणी, पेरू 300 ते 400 क्रेटस, कलिंगड 30 ते 35 गाड्या, खरबूज 20 ते 25 गाड्या, बोरे 5 ते 10 डाग तर द्राक्षांची 20 टन इतकी आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे – लिंबे (प्रति गोणी) : 300-1400, अननस : 100-500, मोसंबी : (3 डझन) : 250-400, (4 डझन) : 80-120, संत्रा : (10 किलो) : 200-900, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 70-200, गणेश : 10-40, आरक्ता 20-80. कलिंगड : 5-10, खरबूज : 10-25, पपई : 5-20, पेरू (20 किलो) : 400-500, चिक्कू (10 किलो) : 100-550, बोरे (10 किलो) : चण्यामण्या : 700-800. द्राक्षे (10 किलो) : सुपर सोनाका : 400-500, सोनाका : 350-500, जम्बो : 500-650, शरद : 450-500, माणिकचमन (15 किलो) : 450-550, थॉमसन : 400-450.

Back to top button