पुणे : फळभाज्यांचे दर उतरले; कांदा, बटाटा, सिमला मिरची, शेवगा, तोतापुरीची आवक वाढली | पुढारी

पुणे : फळभाज्यांचे दर उतरले; कांदा, बटाटा, सिमला मिरची, शेवगा, तोतापुरीची आवक वाढली

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी (दि.26) फळभाज्यांची आवक वाढली. त्यामुळे कांदा, बटाटा, सिमला मिरची, शेवगा आणि तोतापुरी कैरीच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. नवीन लसणाची आवक वाढली आहे. नवीन आणि जुन्या लसणाची मिळून प्रत्येकी 5 ट्रक आवक झाल्याची माहिती ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

बाजारात रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 90 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या भाजीपाल्याच्या आवकमध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथून 7 ते 8 टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथून 3 ते 4 टेम्पो कोबी, राजस्थान येथून 7 ते 8 ट्रक गाजर, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून 3 ते 4 टेम्पो शेवगा, गुजरात येथून 2 टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून 3 ते 4 टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश येथून तोतापुरी कैरी 5 ते 6 टेम्पो, मध्यप्रदेश येथून 12 ते 13 ट्रक मटार, बंगळूर येथून 1 टेम्पो आले इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 1100 ते 1200 पोती, टोमॅटो 12 ते 13 हजार पेटी, गवार आणि भेंडी प्रत्येकी 5 ते 6 टेम्पो, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, सिमला मिरची 10 ते 12 टेम्पो, तांबडा भोपळा 8 ते 0 टेम्पो, कांदा 70 ते 75 ट्रक, आग्रा, इंदौर आणि स्थानिक भागातून मिळून बटाट्याची 60 ट्रक इतकी आवक झाली.

Back to top button