पिंपरी : आर्किटेक्ट कैलास टिळे अमेरिकेतून मतदानासाठी हजर | पुढारी

पिंपरी : आर्किटेक्ट कैलास टिळे अमेरिकेतून मतदानासाठी हजर

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी खेळाडू, राजकीय पुढारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मतदानाचा हक्क बजावला. आर्किटेक्ट कैलास टिळे यांनी तर थेट लॉस एजेंलस (अमेरिका) येथुन येऊन पिंपळेसौदागर येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. 26) मतदान झाले. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी झाली असली तरी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मतदानाचा हक्क बजावला.

भारतकेसरी पैलवान विजय गावडे यांनी चिंचवडगाव येथील हुतात्मा चापेकर शाळेत पत्नीसह मतदान केले. मतदानानंतर गावडे म्हणाले, भारतीय राज्यघटनेनुसार आपल्याला मतदानाचा हक्क मिळालेला आहे. मतदानाद्वारे आपण निवडून देत असलेल्या उमेदवाराच्या माध्यमातुन नागरिकांना विविध नागरी सोयी-सुविधा मिळतात. त्याचप्रमाणे, विविध योजनांचा लाभ मिळतो. त्यामुळे आपण योग्य उमेदवार निवडला पाहिजे.

खासदार श्रीरंग बारणे यांनी थेरगाव येथील संचेती शाळेतील मतदान केंद्रावर पत्नी सरिता बारणे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. या प्रसंगी बारणे म्हणाले, मतदान हा आपला मुलभूत हक्क आहे. भारतीय जनता पक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये मोठ्या फरकाने विजयी होतील. चिंचवडमध्ये तिरंगी नव्हे तर दुरंगीच लढत आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचा मोठा मतदार आहे.

अमेरिकेतून व्हाया मुंबई पिंपळे सौदागर
अमेरिका येथे कामासाठी गेलेले आर्किटेक्ट कैलास टिळे हे त्यांची पत्नी सविता टिळे यांच्यासह आज सकाळी मुंबई विमानतळावर उतरले. तेथुन पिंपळे सौदागर येथे येत त्यांनी जी.के.गुरुकुल येथे तर, त्यांच्या पत्नी सविता टिळे यांनी चॅलेंजर पब्लिक स्कूल येथे मतदान केले. ते खास चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी आले होते. टिळे म्हणाले, चांगल्या व्यक्ती राजकारणात निवडून यायला हव्या. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत सर्वांनी भाग घेणे आवश्यक आहे. मतदानाचा हक्क जर आपण बजावत नसू तर आपल्याला राजकारणाविषयी बोलण्याचा अधिकार राहत नाही.

मतदानाच्या वेळी माझी कामे बाजूला ठेवून दरवेळी मतदान करून मी माझे कर्तव्य बजावते. काही बदल अपेक्षित असेल तर लोकशाहीत आपले कर्तव्य बजावले तर नक्कीच आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार राहतो. तरुणांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले पाहिजे.
                                                             – अंजली भागवत (नेमबाज)

Back to top button