पिंपरी : हिंदी कवीला जडले ‘मराठी’शी प्रेम; एक वर्षापासून मराठी शिकण्याचे धडे | पुढारी

पिंपरी : हिंदी कवीला जडले ‘मराठी’शी प्रेम; एक वर्षापासून मराठी शिकण्याचे धडे

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : सध्या शहरात अमराठी नागरिकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे बहुतांश मराठी भाषा बोलणारे नागरिकही हिंदीचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसतात. पण, मराठी लिहायला व वाचायला शिकावं असं कोणाच्याही मनात येत नाही. मात्र, नेहरूनगर येथील एका हिंदी कवीला मराठीशी प्रेम जडले असून गेल्या एक वर्षापासून ते मराठी भाषेचे धडे घेत आहेत.

मूळचे बनारस येथील जितेंद्र रॉय हे पिंपरी चिंचवड शहरात लहानपणापासून वास्तव्यास आहेत. त्यांचे संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे. रॉय हे हिंदी भाषेतून सहज कविता करतात. तसेच ते उत्तम लेखक देखील आहेत. पण आपण ज्या राज्यात राहतो तेथील मातृभाषा आपण शिकायला पाहिजे. या उद्देशाने ते शहरातील लेखक व साहित्यिक असणारे राज अहेरराव यांच्याकडे मराठीचे धडे घेत आहेत.

अमराठी नागरिकांना कालांतराने मराठी बोलता येते पण हे फक्त संवाद साधण्यापुरतेच मर्यादित असते. तसेच शहरात बहुभाषिक नागरिकांची मुले देखील मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेताना दिसतात. मात्र, त्यांचाही कल पुढे हिंदी व इंग्रजी भाषेकडे वळतो. त्यामधून साहित्यनिर्मिती करावी असा विचार कोणी करताना दिसत नाही. रॉय हे फायनान्शियल अ‍ॅडवायजर म्हणून ते काम करत आहेत. पण त्यांना मराठीमधून देखील काव्यरचना आली पाहिजे अशी इच्छा आहे. सध्या ते लिहिण्याचा वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. रॉय यांच्या घरात हिंदीतून व्यवहार केले जातात. प्रत्येक भाषेचा आपला स्वत:चा

गोडवा आहे. देशामध्ये हिंदी बोलणार्‍यांचे क्षेत्र मोठे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात देखील हिंदी मोठ्या प्रमाणात बोलली जाते. रॉय यांनी हिंदी शिकण्यासाठी लायब्ररी लावली आहे. ते मराठीतील पुस्तके वाचतात त्याने शब्दसंग्रह वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत.

मराठीमध्ये कविता अलंकारीत करणे सोपे नाही. जसे मी हिंदीमध्ये सहज करतो तसे मला मराठीतदेखील जमायला हवे. आता सुरुवात केली आहे. वीररस आणि व्यंय हे दोन व्याधी आहेत. मराठीत मी लेख लिहू शकतो पण त्यास कवितेमध्ये सादर करणे जमत नाही. जशी हिंदीवर पकड आहे तशी मराठीवर नाही, तर आता मी हळूहळू शिकत आहे. जशी मराठी बोलता येते तसे लिहिता आले तर ‘सोने पे सुहागा’ होईल.

                                                                       – जितेंद्र रॉय

Back to top button