पिंपरी : पोलिसांची दमछाक; एकाच मतदान केंद्रावर अनेक बूथ असल्याने संभ्रम | पुढारी

पिंपरी : पोलिसांची दमछाक; एकाच मतदान केंद्रावर अनेक बूथ असल्याने संभ्रम

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिंचवड आणि थेरगाव येथील एकाच मतदान केंद्रावर जास्त बूथ असल्याने मतदारांचा गोंधळ उडाला. यावेळी मतदारांना समजून सांगण्यात असताना पोलिसांची दमछाक झाल्याचे पहावयास मिळाले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या रिक्त जागेसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. त्यासाठी सकाळी व संध्याकाळी नागरिक घराबाहेर पडले.

चिंचवड येथील फत्तेचंद जैन विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये 19 तर, थेरगाव गावठाण येथील महापालिकेचे शाळेत तब्बल 16 बूथ होते. ज्यामुळे मतदारांचा गोंधळ उडाला. एकाच कुटुंबातील मतदारांचे वेगवेगळ्या खोलींमध्ये नाव असल्याने अनेकजण मतदान झाल्यानंतर कुटुंबियांची वाट पाहत ताटकळत बसल्याचे दिसून आले. दरम्यान, ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसांकडे नागरिक अडचणी घेऊन जात होते. पोलीसही त्यांना समजावून सांगत खोलीपर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करीत होते. मात्र, बहुतांश मतदारांना बूथपर्यंत पोहोचण्यात अडचणी येऊ लागल्याने गर्दीच्यावेळी पोलिसांचीही धांदल उडाल्याचे दिसून आले.

सहायक आयुक्तांनी केली मदत
चिंचवड येथील बूथवर व्हिजिट साठी आलेल्या सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांना देखील मतदारांचा गोंधळ उडत असल्याचे दिसून आले. यावर त्यांनी ड्युटीवरील कर्मचार्‍यांना वृद्ध, महिला, अपंग व्यक्तींना मतदान खोलीपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक मदत करण्यास सांगितले. तसेच, स्वतः देखील मतदारांना खोली क्रमांक व मार्ग समजावून मदत केली.

विनाकारण फिरणार्‍यांची धरपकड
मतदान केंद्रात विनाकारण फिरणार्‍या तरुणांकडे पोलिस विचारपूस करीत होते. समाधानकारक उत्तर देताना आलेल्या तरुणांना थेट पोलीस गाडीत बसायला सांगत होते. अशा प्रकारे स्थानिक पोलिसांनी दिवसभर तरुणांची धरपकड केली.

संवेदनशील केंद्रावर तगडा पहारा
निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या संवेदनशील मतदान केंद्राव्यतिरिक्त पोलिसांनी देखील पाच मतदान केंद्रे संवेदनशील केंद्र म्हणून जाहीर केले होते. या केंद्रावर स्थानिक पोलिसांसह साध्या वेशातील पोलीस तसेच अतिरिक्त पोलीस फाटा तैनात असल्याचे पहावयास मिळाले. इतर मतदान केंद्राच्या तुलनेत येथील मतदान केंद्रांवर पोलिसांनी विशेष लक्ष दिले. त्यामुळे संवेदनशील असलेल्या कोणत्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडल्याची नोंद नव्हती.

साहेब…! शिट्टी नका वाजवू
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या रिक्त जागेसाठी भाजपा, महाविकास आघाडी आणि अपक्ष अशी तिरंगी लढत झाली. यातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे शिट्टी निवडणूक चिन्ह होते. दरम्यान, मतदान केंद्राबाहेरील गर्दी पांगवण्यासाठी पोलिस नेहमीप्रमाणे शिट्टी वाजवत होते. त्यामुळे शिट्टीचा प्रचार होत आहे, असे वाटू लागल्याने विरोधी गटातील एका कार्यकर्त्याने पोलिसांना थेट शिट्टी न वाजवण्याची विनंती केली.

Back to top button