पुणे : हुतात्मा स्मृतिवनातील झाडे पाण्याअभावी जळाली | पुढारी

पुणे : हुतात्मा स्मृतिवनातील झाडे पाण्याअभावी जळाली

महाळुंगे पडवळ : पुढारी वृत्तसेवा :  महाळुंगे पडवळ (ता.आंबेगाव) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वन विभागाकडून उभारलेल्या देशभक्त हुतात्मा बाबू गेनू सैद स्मृतिवनातील झाडे पाण्याअभावी जळून गेली आहेत. वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाळुंगे पडवळ येथे बाबू गेनू सैद यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी वन विभागाने स्मृतिवन उभारले आहे. तेथे विविध प्रकारच्या 75 वृक्षांचे रोपण केले होते. झाडांना पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानने 25 हजार रुपये खर्च करून चौथरा बांधला होता. चौथ-यावर पाण्याची टाकी बसवून त्यात पाणी सोडण्याची व्यवस्था केली होते.

वन विभागाचा एक कर्मचारी झाडांना नित्यनेमाने पाणीही देत होता, परंतु त्याची बदली झाल्याने झाडांना पाणी देणे बंद झाले आहे. त्यामुळे पाण्याअभावी झाडे जळून लागली आहेत, असे हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानचे अध्यक्ष रंगनाथ चासकर यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या अमतमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्म्यांप्रती आदर म्हणून मोठा गाजावाजा करून वन विभागाकडून स्मृतिवन उभारण्यात आले. पाण्याची व्यवस्था करून दिली. मात्र, महाळुंगे पडवळ ग्रामपंचायतची सुमारे 50 हजार लिटर पिण्याच्या पाण्याची टाकी झाडे लागवड केलेल्या अंतरापासून फक्त शंभर मीटर अंतरावर असूनही वन विभागाकडून झाडांना पाणी दिले जात नाही. त्यामुळे 10 ते 15 झाडे जळाली असून, अन्य झाडे सुकू लागली आहेत. वन विभागाने तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानचे संस्थापक व शरद सहकारी बँकेचे संचालक के. के. सैद यांनी केली आहे.

 

Back to top button