पुणे : खा. कोल्हे मालिकांमध्ये व्यस्त ; आढळराव पाटील यांची टीका | पुढारी

पुणे : खा. कोल्हे मालिकांमध्ये व्यस्त ; आढळराव पाटील यांची टीका

शिरूर : पुढारी वृत्तसेवा :  शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तर मालिकांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतात, अशी टीका शिवसेनेचे नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. शिरूर येथे कार्यक्रमानिमित्त आले असता आढळराव पत्रकारांशी बोलत होते. खासदार अमोल कोल्हे यांच्याविषयी बोलायला काहीच नाही. लोकांमध्ये फिरण्याऐवजी ते मालिकांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतात. शिवजयंतीदिनी शिवनेरीच्या कार्यक्रमावर त्यांनी बहिष्कार घातला. शंभरफुटी भगवा ध्वज लावावा, ही त्यांची मागणी केंद्र शासनाकडे प्रलंबित आहे. खासदार दिल्लीत असतात. चार वर्षांत दिल्लीत राहून पाठपुरावा करून हे काम करून घ्यायला पाहिजे होते.

या नवीन आलेल्या सरकारला ते दोष देताहेत. आरोप करताहेत. अडीच वर्षे त्यांचे सरकार असताना हे करता आले नाही. चार वर्षांत पुरातत्व खात्याकडून परवानगी घेता आली नाही. फक्त शोबाजी करायची. कामे कशी करायची, हे माहीत नाही. भाषणे इतकी मोठी की वाघसुद्धा घाबरून जाईल. पूर्वीच्या सरकारने धर्मवीर संभाजी महाराज स्मारक आराखडा 270 कोटींचा केला होता. तो मी 400 कोटींचा केला. 13 कोटींचे दोन भगवे ध्वज तेसुद्धा 100 फुटांचे मंजूर केले. त्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. तुम्हाला 100 फुटांचा मंजूर करता येत नाही. कसले संसदरत्न? आधी कामे करायला शिका, नंतर स्टंटबाजी करा, असा टोला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लगावला. या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, युवासेना जिल्हाप्रमुख बापू शिंदे, शहरप्रमुख मयूर थोरात आदी उपस्थित होते.

पक्षाने उमेदवारी दिल्यास लढेन
माजी जिल्हा परिषद सभापती मंगलदास बांदल यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढण्याचे जाहीर केल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, प्रत्येकाला निवडणूक लढायचा अधिकार आहे. निवडणुका अद्याप दूर आहेत. मला पक्षाने उमेदवारी दिल्यास मी निवडणूक लढेन; अन्यथा थांबेन, असेही आढळराव यांनी सांगितले.

व्हिडीओ खोडसाळ
विरोधकांनी खोडसाळपणे माझा एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. तसा कुठलाही प्रकार मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत झाला नसल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद चालू असताना मी दोन तास त्या ठिकाणी बसून होतो. पत्रकार परिषद संपली, असे सांगितल्यानंतर मी, मुख्यमंत्री व प्रवक्ते नरेश म्हस्के आम्ही तिघेही उठलो. परंतु, एका पत्रकाराने खाली बसण्याचा आग्रह केला. त्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खाली बसले व मी बाहेर जाण्यासाठी उठलो, एवढेच झाले. मात्र, या व्हायरल व्हिडीओतून लोकांमध्ये संभ—म निर्माण करण्याचे काम विरोधकांनी खोडसाळपणे केले आहे. 2019 च्या निवडणुकीदरम्यानही असाच प्रकार करण्यात आला होता.

Back to top button