बारामती : काटेवाडीत सात जणांना जिवे मारण्याचा प्रयत्न | पुढारी

बारामती : काटेवाडीत सात जणांना जिवे मारण्याचा प्रयत्न

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  लग्नाच्या पायापडणी कार्यक्रमात नाचताना झालेल्या भांडणाचे पर्यवसान हाणामारीत झाले. काटेवाडी (ता. बारामती) येथे घडलेल्या या घटनेत सात जणांना लोखंडी गज, लाकडी दांडके, डोक्यात दगड घालत जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत 5 लाख रुपयांची दहा तोळ्यांची सोन्याची साखळी नेण्यात आली. बारामती तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन नाना हरिहर, किसन अजिनाथ धोत्रे, सचिन देविदास माने, महादेव अजिनाथ धोत्रे (सर्व रा. अंथुर्णे, ता. इंदापूर) यांच्यासह अन्य चार अनोळखींचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. याप्रकरणी रामचंद्र भागवत ठोंबरे (रा. काटेवाडी, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.

गुरुवारी (दि. 23) ही घटना घडली. या घटनेत फिर्यादी रामचंद्र भागवत ठोंबरे, ऋषिकेश शेळके, सागर करे, विक्रम काळे, सागर ठोंबरे, शुभम काळे, रोहित टकले हे जखमी झाले आहेत. घटनेच्या दिवशी काटेवाडीत गणेश शिवाजी टिंगरे यांच्या घरी लग्नानिमित्त पायापडणीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला सागर करे, सागर ठोंबरे, विक्रम काळे, ऋषिकेश शेळके, रोहित टकले, शुभम काळे, सचिन नरुटे, लहू गायकवाड, युवराज काळे असे एकत्रित टिंगरे यांच्या घरी गेले होते. या वेळी मिरवणूक चालू असताना ऋषिकेश शेळके यांचा सचिन हरिहर याच्याशी नाचताना धक्का लागल्याने वाद झाला होता. तो तेथेच मिटविण्यात आला होता.

मिरवणुकीनंतर जेवणाचा कार्यक्रम सुरू असताना सचिन हरिहर याने ऋषिकेशच्या डोक्यात लाकडी दांडा मारल्याने त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. त्याला तत्काळ भवानीनगरला हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. या घटनेमुळे रामचंद्र ठोंबरे यांनी हरिहर याला शिवी देत टिंगरे यांच्या घरात पाठविले. या वेळी हरिहरने ‘थोडे थांबा, गावातून लोक बोलावून तुम्हाला जिवंत सोडत नाही,’ अशी धमकी दिली. या घटनेमुळे तेथील वातावरण स्तब्ध झाले. काही वेळातच भवानीनगरकडून मोटार आली. त्यातून चौघे लोखंडी गज, लाकडी दांडके घेऊन उतरले. त्यांनी विक्रम काळे याच्या अंगावर लोखंडी गज मारला.

ठोंबरे व सागर करे हे काय झाले, हे पाहण्यासाठी गेले असता सागरच्या डोक्यातही लोखंडी गज मारण्यात आल्याने डोक्यातून मोठा रक्तस्राव होऊ लागला. रामचंद्र ठोंबरे यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही डाव्या हाताला रॉडने मारहाण करण्यात आली. ‘तुमचे आता संपले आहे, तुम्हाला आता जिवंत ठेवत नाही,’ असे म्हणत रामचंद्र ठोंबरे यांच्यासोबत असलेल्या सागर ठोंबरे, रोहित टकले, शुभम काळे यांनाही बेदम मारहाण झाली. या भांडणात फिर्यादीच्या गळ्यातील 10 तोळ्यांची सोन्याची साखळी कोणी तरी काढून घेतली. जखमींना बारामती तसेच भवानीनगरला उपचारांसाठी हलविण्यात आले.

 

Back to top button